पुणे, दि. ५ (पीसीबी)- काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाइलवर संपर्क साधून अज्ञात व्यक्तीने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अविनाश रमेश बागवे (रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवे यांच्या मोबाइलवर अज्ञाताने व्हॉट्सॲप कॉल केला. बागवे यांना धमकावून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास निवडणुकीला उभे राहू देणार नाही. गोळ्या घालून जीवे मारू तसेच राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी अज्ञाताने बागवे यांना दिल्याचा आरोप आहे.
जल्दी से पैसे भेज वर्ना जान से मार देंगे, असे मेसेजमध्ये म्हटले होते. आपण खराडीमधून मुस्कान शेख बोलत असून ३० लाख रुपये पाठवून दे, नाहीतर तुला मारण्यासाठी माझी माणसे तयार आहेत, असेही म्हणण्यात आले होते. दोन दिवसांत पैसे दिले नाहीत, तर तुला खल्लास करू, अशी धमकी आल्याचे बागवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे
बागवे यांनी पोलिसांकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर तपास करीत आहेत.
याआधी, श्री रामनवमीच्या शोभायात्रेत भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्या मोबाइलवर संपर्क साधून अज्ञाताने त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. बिडकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.