संभाजीनगर, दि. ३ (पीसीबी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरू आहेत, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार बसणार असल्याचं स्पष्ट होत आहे. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते खरंच झालं आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.
संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. हे तुम्ही पाहत आहात. मला तरी असं वाटतंय की अनेक दिवसांच्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे. एवढा मोठा नेता त्यांना काँग्रेसमध्ये वागणूक बरोबर मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील, असं संजय शिरसाट म्हणाले. प्रयत्न तसेच चालू आहेत. अनेक घडामोडी तशा सुरू आहेत. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला.