वीजदर वाढीचा झटका… सामान्यांना फटका… दरवाढ रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन – काशिनाथ नखाते

0
306

पिंपरी दि.२ (पीसीबी)- महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिक हा महागाईत होरपळून जात असून पेट्रोल,डिझेल आणि गॅसच्या दरवाढीनंतर आर्थिक अडचणीत आलेल्या सर्वसामान्यांना वीज कंपन्यांनी मोठा झटका देऊन १ एप्रिल पासून १२ ते ३६% दरवाढ रद्द केली आहे यामुळे विद्युत नियामक आयोगाचां व महावितरणचा निषेध करत ही दरवाढ त्वरित मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, सारथी चालक-मालक महासंघातर्फे झालेल्या चिखली येथे दरवाढीबाबत बैठक झाली. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, बालाजी लोखंडे, नितीन सुरवसे,नाना कसबे, संतोष तेजकर, इरफान मुल्ला, ओमप्रकाश मोरया, राजू बोराडे, राजू खंडागळे, बाळासाहेब शेगडे, मोमीन जलाल, शंकर पवार,नाना खंडागळे,पांडुरंग शेलवणे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यासह पिंपरी चिंचवड मधील वीज ग्राहकांना वेळेवर वीजच मिळत नाही, अनेक वेळा वीज जाते त्यामुळे अनेक नागरिकांचे कामे खोळंबलेली असतात विजवितरण, महावितरण कंपनीने ऐन उन्हाळ्यात विजेचा मोठा झटका ग्राहकांना दिलेला आहे . सन २०२३-२४ मध्ये २.९ % तर २०२४-२५ साठी ५.६ % दरवाढ जाहीर करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र १२ % ते ३६ टक्के वाढ झालेली निदर्शनास येत आहे. यापूर्वी शुल्क ३.३६ वरून ४.११ वर, व्हेरिएबल चार्ज ४.७१ वरून ५.२८ वर फिक्स चार्ज १०५ वरून ११६ वर अशाप्रकारे ग्राहकांची लुबाडणूक केली जाणार आहे, फसवणूक केली जात आहे याचा आम्ही सर्वजण निषेध करीत असून ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलने करण्यात येतील असा इशाराही नखाते यांनी यावेळी दिला आहे.