बापट यांच्या मरणाची वाट पहात होते की काय ?

0
267

पुणे, दि. १ (पीसीबी) – भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यावरून बॅनरबाजी देखी सुरू झाली आहे. भावी खासदार म्हणून भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात मोठ मोठे होर्डींग्ज लावल्याने अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. थोडीतरी माणुसकी ठेवा, असे म्हणत पवार यांनी मुळीक यांचा समाचार घेतला.

गिरीश बापट यांना जाऊन अवघे तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात बॅनर लावले आहे. त्यावर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मी काल गिरीश बापट यांच्या पत्नीला मुलाला, सुनेला भेटायला गेलो होतो. बापट त्यांच्या अस्थिचे देखील विसर्जन झाले नाही. थोडी माणुसकी राहुद्या, गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. १३ ते १४ दिवस दुखवटा पाळण्याची आपल्यात पद्धत आहे. सगळ्यांची त्याचे तारतम्य ठेवले पाहिजे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी देखील हे लक्ष ठेवावे.

एवढी घाई कशाची आहे?

गिरीश बापट यांच्या निधनाला तीन दिवस झाले आहेत. माणुसकी देखील एक गोष्ट आहे. महाराष्ट्राला सभ्य राजकीय परंपरा आहे. आतापासूनच निवडणुकीबद्दल बोलायला लागलो तर लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, असे अजित पवार म्हणाले.

संजय राऊत धमकी प्रकरणावर अजित पवार म्हणाले, कुणाला धमकी आली असेल तर तक्रार करावी लागेल. सरकारने याची दखल घ्यावी. जे जनतेचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्याबाबत अशा घटना घडयला नको. अनेकांना धमक्या येतात. शरद पवार, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी यांना देखील धमक्या आल्या होत्या. पोलीस तपास करतील.