शहरात ‘आप’ने लावले ‘मोदी हटवा, देश वाचवा’चे बॅनर

0
215

पिंपरी, दि.१ (पीसीबी) – शहरात ठिकठिकाणी ‘मोदी हटवा, देश वाचवा’ या आशयाचे बॅनर सकाळी पाहायला मिळाले. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने आंदोलन घेऊन ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम शहरात सुरू केली असल्याचे जाहीर केले.

ज्याप्रमाणे इंग्रजांनी देशातील नागरिकांवर दडपशाही केली, त्याच पद्धतीची दडपशाही मोदी सरकार करत आहे. हिंडनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एल आय सी, एस बी आय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली. परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला.

गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारच्या कारकिर्दीत काही मोजक्या भांडवलदारांची 8 लाख कोटींची कर्जे माफ करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते, परंतु शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याबाबत एका वर्षात निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन देखील मोदी सरकारला त्याबाबत निर्णय घेता आलेला नाही.

ईडी-सीबीआय या केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारख्या कायद्यांचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे. महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारला केंद्राच्या सत्तेतून पायउतार केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने देशभरात ‘मोदी हटाव, देश बचाव’ ही मोहीम देशभर सुरू केली आहे.

शहरात लागलेले बॅनर आम आदमी पार्टीने लावले आहेत. ही मोहीम म्हणजे केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात फुंकलेले रणशिंग आहे. देशाला आता शिकलेला पंतप्रधान अपेक्षित आहे. या मोहिमेला देशभरातुन पाठिंबा मिळत आहे.

ही मोहीम सुरूच राहणार असून शहरभरात आणखी बॅनर-पोस्टर लावले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.