१२५ अब्ज डॉलरच्या आसपास बाजारमूल्य घसरल्याने अदानी समूहाने विस्ताराच्या योजना गुंडाळल्या

0
243

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – अदानी समूहाची वाटचाल हिंडेनबर्ग रिसर्चच्या गैरव्यवहार आणि लबाड्यांचा आरोप करणाऱ्या अहवालानंतर पुरती मंदावली असून, अहवालापश्चात दोन महिन्यांत अदानी समूहाने विस्ताराच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना गुंडाळल्या अथवा लांबणीवर टाकल्याचे दिसून येत आहे.

अदानी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू आहेत, असा आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला जाहीर केला होता. तेव्हापासून अदानी समूहातील कंपन्यांचे समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू असून, एकंदर १२५ अब्ज डॉलरच्या आसपास समूहाच्या बाजारमूल्याचे पतन झाले आहे. याचा परिणाम म्हणजे समूहाने नवीन क्षेत्रांमध्ये विस्ताराच्या आखलेल्या योजना एक तर पूर्णपणे गुंडाळल्या अथवा त्यांना लगाम घालून काम थांबविले असल्याची माहिती समूहातील अंतर्गत सूत्रांनी दिली.

देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा असणाऱ्या समूहांमध्ये अदानींचा समावेश होतो. नवीन क्षेत्रात वाढीच्या संधी शोधण्याच्या उद्देशाने निधी उभारणीसाठी समूहाने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. आता समूहाने पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मुंद्रा बंदरावरील ४ अब्ज डॉलरचा कोळसा ते पॉलीविनाईल क्लोराइड प्रकल्पही गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

त्याउलट ॲल्युमिनियम, पोलाद आणि रस्ते प्रकल्पांना समूहाकडून पुन्हा प्राधान्य दिले जात आहे. समूहासाठी महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रांमध्येच वेगळ्या पद्धतीने उतरण्याचा विचार सुरू असल्याचेही माहीतगार सूत्रांनी सांगितले.

अदानी समूहाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी मात्र हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील प्रत्येक आरोपाचे मुद्देसूद खंडन करण्यात आल्याचा पुनरुच्चार केला. तसेच कोळसा-ते-पॉलिव्हिनाईल क्लोराइड प्रकल्पासाठी पुढील सहा महिन्यांत निधीची व्यवस्था केली जाईल, असे गेल्या आठवड्यात अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले. हा उपक्रम रखडल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्याही चुकीच्या असल्याचे म्हणत प्रवक्त्यांनी त्यांचे खंडन केले.

कर्ज जोखीम कमी करण्यावर भर
अदानी कुटुंबाने त्यांच्या मालकीच्या समभागांची विक्री करून, कंपन्यांतील प्रर्वतकांचे समभाग तारण ठेवून उचललेले २१५ कोटी डॉलरच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड अलीकडेच केली आहे. समूहावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. पूर्वीच अशाच उसनवारीतून अदानी समूहाकडून विविध कंपन्यांच्या अधिग्रहणासह घोडदौड सुरू होती. आता मात्र अशा अधिक जोखीमयुक्त कर्ज प्रकाराशी जाणीवपूर्वक फारकत घेतली जात आहे. कर्जप्रेरित विस्ताराला मुरड घालून, हिंडेनबर्गने हादरे दिलेला आत्मविश्वास पुन्हा कमावण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी नमूद केले.