कर्नाटकात भाजपचा पराभव होणार ?

0
228

कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा, भाजपचे पानीपत होणार

बेंगळुरू, दि. ३० (पीसीबी) – आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे टाइम्स नाऊ-व्हीएमआरद्वारे करण्यात आलेल्या निवडणूकपूर्व जनमत चाचणीद्वारे स्पष्ट होत आहे. यामुळे कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या चाचणीनुसार कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये तुल्यबळ मुकाबला होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

या चाचणीद्वारे स्पष्ट होणारी स्थिती लक्षात घेता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय मतांमध्ये परिवर्तीत झाल्याचे दिसत नाही हे विशेष. अशा स्थितीत जेडीएसचे प्रमुख एच. डी. कुमारस्वामी किंगमेकरची भूमिका वठवू शकतात असेच या चाचणीद्वारे सिद्ध होत आहे. २२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला ९१ जागा, तर भाजपला दोन जागा कमी, म्हणजेच ८९ जागा मिळू शकतात असे दिसते. विशेष म्हणजे जेडीएसला ४० जागा मिळतील असा अंदाज बांधण्यात आला आहे.

टाइम्स नाउ-व्हिएमआरच्या जनमत चाचणीनुसार, जर आज निवडणूक घेतली गेली तर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि येडियुरप्पा हे दोघेही सरकार बनवू शकणार नाहीत. याचे कारण म्हणजे दोघेही ११२ या अंकाच्या मागेच असल्याचे दाखवण्यात आले आहे. मध्य कर्नाटकात भाजपला मोठे यश मिळू शकते. इथे भाजपला ३५ पैकी २२ जागा मिळू शकतात. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ४ जागा मिळाल्या होत्या. तर, गेल्या निवडणुकीत १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी मात्र १० जागांवरच समाधान मानावे लागू शकते. जेडीएसला इथे फक्त ३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

ज्या भागात धार्मिक आधारावर ध्रुवीकरण महत्त्वाची भूमिका बजावते त्या कर्नाटकाच्या किनारपट्टीकडील भागात भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. या भागात पक्षाला २१ पैकी ८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. ग्रेटर बेंगळुरू क्षेत्रात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात काँग्रेस पक्षाला १७, तर भाजपला १३ जागा मिळू शकतात.

जुन्या म्हैसूर क्षेत्राचे चित्र –
जुन्या म्हैसूर क्षेत्रात जेडीएसचा स्वत:चा जनाधार आहे. इथे पक्षाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. जेडीएस या क्षेत्रातील एकूण ५५ जागांपैकी २५ जागांवर विजय संपादन करू शकतो. भाजपला येथे ८ जागा, तर काँग्रेसला २० जागा मिळू शकतात.

लिंगायत धर्माबाबतचा निर्णय किती यशस्वी ? –
लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या सिद्धरामय्या यांच्या निर्णयामुळे मतदारांवर विशेष प्रभाव पडलेला जाणवत नाही. मुंबई कर्नाटक क्षेत्रात ( जे लिंगायत राजकारणाचे केंद्र आहे) काँग्रेसला २१ जागा, तर भाजपला २३ जागा मिळतील असे दिसते.

टाइम्स नाउ-व्हीएमआर जनमत चाचणी ४ एप्रिल आणि १६ एप्रिलदरम्यान घेण्यात आली आहे. यात राज्यातील सर्व क्षेत्रांमघील ४००० हून अधिक लोकांना सहभागी करून घेण्यात आले. चाचणीसाठी प्रत्येक क्षेत्राचे समान प्रतिनिधीत्व लक्षात घेत मतदार संघांची निवड करण्यात आली होती.