पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार, शिरोळे, काकडे, मिसाळ यांची नावे चर्चेत

0
366

पुणे, दि. ३० (पीसीबी) : राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आता या ठिकाणी निवडणूक होणार का? या संदर्भात चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात काय नियम आहेत? पोटनिवडणूक झाली तर कधी होणार? हे प्रश्न आहेत. सर्वात आधी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी पुणे येथील जागा रिक्त झाल्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवतील. त्यानंतर निवडणूक आयोग या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात निर्णय घेईल. दरम्यान, पोटनिवडणूक झाल्यास माजी खासदार अनिल शिरोळे, सुर्यकांत काकडे, आमदार माधुरी मिसाळ यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.

कायद्यानुसार लोकसभेची जागा रिक्त असेल तर त्या ठिकाणी सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक झाली पाहिजे. 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विद्यामान लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक होणार आहे. जर हा कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी असता तर निवडणूक झाली नसती, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 29 मार्च रोजी राहुल गांधी प्रकरणात हे स्पष्टीकरण दिले. राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. वायनाड प्रकरणात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा अधिक आहे, यामुळे निवडणूक होईल, परंतु त्याला सहा महिन्यांचा कालावधी आहे, असे राजीवकुमार यांनी म्हटले होते. यामुळे हाच नियम पुणे येथे आहे.

पुणे कसबा पेठ व पिंपरी चिंचवडमधील आमदारांचे निधन झाले. त्याठिकाणी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक झाली होती. त्याचप्रमाणे आता खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुण्यात पुन्हा पोटनिवडणूक होऊ शकते. कारण 1951 सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते. लोकसभा निवडणूक 2024 मे मध्ये पूर्ण होत आहे. आता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ आहे. त्यामुळे ही निवडणुक घ्यावी लागणार आहे. ही निवडणुक सहा महिन्याच्या आत घ्यावी लागणार आहे.