नवनीत राणा यांच्या कास्ट सर्टिफिकेट प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

0
237

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – महाराष्ट्रातील अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या कास्ट सर्टिफिकेट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, त्यात त्यांचे कास्ट सर्टिफिकेट बनावट असल्याचे म्हटले आहे.

वास्तविक, 8 जून 2021 रोजी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. राणा अमरावती लोकसभा मतदार संघाच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन निवडून आल्या आहेत. नवनीत राणा यांनी बनावट प्रमाणपत्रे बनवून येथून लोकसभा निवडणूक जिंकल्याचा आनंदराव अडसूळ यांचा आरोप होता.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाला राणा यांचे जात प्रमाणपत्र चुकीचे आढळले होते. या प्ररकणी उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यांत सर्व दाखले सादर करण्याचे आदेश देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने 22 जून 2021 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

2014 मध्येही कास्ट सर्टिफिकेट रद्द करण्यात आले

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या नवनीत कौर राणा या अमरावतीच्या बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्रही मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले होते. त्यादरम्यान नवनीत कौर यांनी त्यांच्या वडिलांचे 3 बनावट शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र बनवून नवनीत कौर हरभजनसिंग कुंडलेस या नावाने जात प्रमाणपत्र मिळवल्याचे सिद्ध झाले. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.