देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने उडाला गोंधळ; नागपूर पोलिसांनी एका रात्रीत केली धडक कारवाई

0
160

नागपूर, दि.२९ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या इसमाला पोलिसांनी रात्री नागपूरमध्ये बेड्या ठोकल्या. पोलिसांनी फडणवीसांच्या घराचा कानाकोपरा तपासला. मात्र, त्यांना कसलीही बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही काही दिवसांपूर्वी धमकी आली होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही अशा धमक्या अनेकवेळ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे पोलिस दक्ष आहेत.

नेमके झाले काय?

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बॉम्ब ठेवल्यीच धमकी एका इसमाने दिली होती. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांना फोनवरून तसे कळवले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच धांदल उडाली. नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री बारा वाजता फडणवीसांच्या घरी धडक दिली. घराचा काना आणि कोपरा धुंडाळला. मात्र, घरात कसलिही बॉम्ब सदृश वस्तू आढळली नाही. त्यामुळे हा फेक कॉल असल्याचे समोर आले.

दुखावलेली व्यक्ती

धमकी देणारी व्यक्ती काही कारणामुळे दुखावली होती. त्यामुळे त्याने दिशाभूल करण्यासाठी ही नसती उठाठेव केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला बेड्या ठोकल्यात. तसेच अधिक चौकशी सुरू असून, पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अमृतांना केले ब्लॅकमेल

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचेही नुकतेच समोर आले होते. अमृता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची अनिक्षा जयसिंघानीशी 2021 मध्ये भेट झाली. अनिक्षाने अमृतांना आपल्याला आई नसल्याचे सांगितले. तसेच आपण डिझायनर असल्याचाही दावा केला होता. तिने आपल्या प्रमोशनसाठी अमृता यांना सार्वजनिक कार्यक्रमात आपले कपडे व दागिणे घालण्याची विनंती केली होती. ती अमृतांनी मान्य केली. त्यानंतर अनिक्षाने वडिल अनिल जयसिंघानी यांच्या मदतीने धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनिक्षा व तिच्या वडिलांविरोधात भादंवि कलम 120 ब (कट) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गडकरींना आले फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानीही काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आलेत. कॉलवरून नितीन गडकरींकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने स्वत:चे नाव जयेश पुजारी असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच एका तरुणीलाही ताब्यात घेतले होते.