आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि भाजपात युती होणार ?

0
249

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर या भाषणातील विविध मुद्द्यांवरून भाजपा नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे निशाणा साधला आहे. दरम्यान, त्यांनी आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि भाजपात युती होणार का? या प्रश्नावरही भाष्य केलं आहे. ते बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

‘२०२४ नंतर भाजपा सरकार आलं, तर देशात निवडणुका होणार नाहीत’ या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “मागील पंचवीस वर्षे शिवसेनेनं भाजपाबरोबर युती केली, त्यावेळी उद्धव ठाकरेंना उपरती झाली नाही. त्यामुळे विश्वासघाताने सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंना हे वाक्य शोभत नाही. उलट त्यांनी आत्मपरीक्षण करावं, हेच योग्य राहील.”

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना सावरकर अवमानप्रकरणी दिलेल्या इशाऱ्यावरूनही विखे-पाटील यांनी टोला लगावला. “उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखाली सरकार असताना, औंरंगाबादमधील औरंगजेबच्या कबरीवर फुलं उधळली गेली. त्यावेळी हे गप्प बसले. सत्ता गेल्यावर त्यांना आता सावरकर दैवत वाटायला लागले, ही चांगली बाब आहे. मात्र, ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्वाशी फारकत घेतली, त्यांच्या तोंडी ही विधानं शोभत नाहीत,” अशी टोलेबाजी विखे-पाटलांनी केली.