शिंदे- राज ठाकरेंच्या भेटीवर राऊतांचा टोला ! अश्रू पुसायला सदू आणि मधू भेटले….

0
251

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – मुख्यमंत्र्यांना काहीच काम नाही. मालेगावच्या सभेनंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांचे अश्रू पुसायला सदू आणि मधू भेटले असतील, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर केली आहे. वीर सावरकर हा आमचा श्रद्धेचा विषय आहे, याबाबत राहुल गांधी यांची भेट घेवून चर्चा करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

खासदार राऊत म्हणाले की, वीर सावरकरांच्या बाबतीत सातत्याने भूमिका व्यक्त केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याशी चर्चा झाली आहे. वीर सावरकर हा आमचा श्रद्धेचा विषय आहे असे सांगितले. दोन दिवसांत राहुल गांधी यांची भेट घेवून याबाबत पुन्हा चर्चा करणार आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. असे ते म्हणाले. मालेगावच्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, आमचा पक्ष आहे हे कालच्या मालेगावच्या सभेने सर्वांनी पाहीलं. मुख्यमंत्र्यांना काहीच काम नाही. त्यांना सर्व दिशांना सभा घेण्याचा नवा छंद जडला आहे. आता उत्तर सभा आहे. नंतर दक्षिण सभा घेतील, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या सभेवर केली आहे. काल सदू आणि मधू भेटले. तसा आम्हाला बालभारतीला धडा होता. ते जूने मित्र असतील म्हणून भेटले असतील किंवा मालेगावच्या सभेनंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील त्यामुळेच एकमेकांचे अश्रू पुसायला ते गेले असतील, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर केली.

शिंदे- राज भेटीने राजकीय चर्चांना सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या भेटीने राजकीय चर्चांना सुरूवात झाली आहे. ही सदिच्छा भेट होती, यात राजकीय युतीची चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, मशिदींवरील भोग्यांवर नियमानुसारच कारवाई केली जाईल, याबाबतच्या नियमांचे पालन केले पाहिजे, अशी भूमिका मांडली. राज्यातील सत्तांतरानंतर रविवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री शिवतीर्थावर पोहचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना पेव फुटले. अलीकडेच गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे आजच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होती.