चिटफंडाच्या नावाखाली चीटिंग करणाऱ्याला तब्बल २५० वर्षांची शिक्षा

0
350

पुणे, दि. २६ (पीसीबी) – चिटफंड कंपनी सुरू करून कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या साईप्रसाद कंपनीच्या पुण्यातील एका संचालकाला तब्बल २५० वर्षांची शिक्षा सिहोर (मध्य प्रदेश) जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी ठोठाविली आहे. तर या कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी दिले आहे. सध्या या शिक्षेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

बाळासाहेब भापकर (रा. पुणे, महाराष्ट्र) असे २५० वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. तर भापकर यांच्यासह कंपनीचे सीहोर शाखेचे कर्मचारी दीपसिंग वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांनाही प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार….!

आरोपी बाळासाहेब भापकरने साई प्रसाद नावाने चिटफंड कंपनी स्थापन केली होती. तर दीप सिंग वर्मा, राजेश उर्फ ​​चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा हे कर्मचारी कंपनी चालवीत होते. या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना ५ वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यामुळे अनेकांनी या चिटफंड कंपनीत पैसे गुंतवले. मात्र पैसे जेव्हा देण्याची वेळ आली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी कंपनीला कुलूप लावून पळ काढला.

दरम्यान, या चिटफंड कंपनीचे ग्राहक आपले पैसे घेण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. या प्रकरणी २०१६ मध्ये सीहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.

सदर गुन्ह्याचा खटला सिहोर जिल्हा न्यायालयात सुरु होता. या खटल्यात वरील सर्व आरोपी दोषी आढळून आले. त्यानंतर विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी आरोपी बाळासाहेब भापकर त्याला २५० वर्षांची शिक्षा झाली आहे. तर कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.