किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

0
413

भोसरी, दि.24 ( पीसीबी) – विराज फुगे याच्या गोठ्यावर का येत नाही, असे म्हणत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री आठ वाजताच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथील भोसरी केंद्र येथे घडली.

सौरभ अंकुश खानेकर (वय 18, रा. खंडोबा माळ भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी शेटे (रा. दिघी रोड भोसरी) आणि कुणाल आकलाडे (रा. खंडोबा माळ भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सौरभ हे त्यांचा मित्र जगदीश श्रीवास्तव याच्यासोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी सनी शेटे आणि कुणाल हे तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांना तू विराज फुगे याच्या गोठ्यावर का येत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी दोघांना जाब विचारला. त्यावरून दोघांनी फिर्यादीस हाताने मारहाण केली. फिर्यादी यांनी विरोध केला असता सनी शेटे याने जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.