सेवानिवृत्त पोलिसाला तब्बल २८ लाखाचा गंडा घातला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

0
221

पुणे, दि. २३ (पीसीबी) – मित्राला फोन करायचा अशी बतावणी करुन मोबाईल घेत बँक खात्याची माहिती चोरी करून एका सेवानिवृत्त पोलिसाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्याने त्यांच्या खात्यातून तब्बल 28 लाख रुपयांना गंडा घातला. हा प्रकार 22 जानेवारी 2021 ते 26 ऑक्टोबर 2022 या कालावधीत घडला.

याबाबत बाजीराव वाघ (वय 62, रा. ससाणेवस्ती, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋषिकेश बाळासाहेब शहाणे (वय 24, रा. सिद्धिविनायक कॉलनी, महंमदवाडी रोड ), सादिक इस्माईल शेख (वय 36, रा. हांडेवाडी रोड, हडपसर), अमेय भगवान सूर्यवंशी (वय 34, रा. तानाजीनगर, धनकवडी), राहुल र्त्यंबके या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघ हे 2017 मध्ये पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. 2020 पासून ते वाडकरमळा महंमदवाडी येथील बसथांब्याजवळ चहाची टपरी चालवतात. सेवानिवृत्तीची रक्कम व इतर असे पैसे त्यांच्या बँक खात्यात होते. घर घ्यायचे असल्यामुळे त्यांनी ते खात्यावर ठेवले होते.

बँक खात्याची गोपनीय माहिती चोरी….

दरम्यान, फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक असल्याचा व त्यांना मोबाईल हाताळण्याचे ज्ञान नसल्याचा फायदा घेऊन आरोपी ऋषिकेशने त्यांचा विश्वास संपादन केला. ते त्याला मुलाप्रमाणे मानत होते. त्या संधीचा फायदा घेत त्याने मित्राला फोन करण्याच्या बहाण्याने वाघ यांचा मोबाईल घेतला. त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरी केली. त्यानंतर तब्बल 28 लाख रुपये त्याने आपले मित्र शेख, र्त्यंबके व सूर्यवंशी यांच्या बँक खात्यावर वर्ग केले.

फिर्यादी वाघ यांनी मंतरवाडी परिसरात एक गुंठा जागा विकत घेतली. त्याचे काही पैसे त्यांना संबंधित व्यक्तीला द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी त्याला चेक दिला. मात्र, समोरील जागा विक्री करणार्‍या व्यक्तीने रोख पैशाची मागणी केली. वाघ हे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले तेव्हा त्यांना खात्यावर 300 रुपये शिल्लक असल्याचे बँकेतील लोकांनी सांगितले.

त्या वेळी त्यांच्या बँक खात्यातील पैसे ऑनलाइन काढून घेतल्याचे समजले. त्यांना मोबाईल कोणाला दिला, याबाबत विचारले असता ऋषिकेशचे नाव पुढे आले. त्यांनी बँक स्टेटमेंट काढून पाहिले तेव्हा ऋषिकेशने वेळोवेळी त्याच्या व इतर मित्रांच्या खात्यावर 28 लाख रुपये वर्ग केल्याचे दिसले. त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने पैसे देतो, असे सांगितले.

मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघ यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव तपास करीत आहेत.