उद्धव ठाकरेंची किती धास्ती, किती भय वाटते, हे कालच्या भाषणातून दिसले

0
237

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : राज ठाकरे यांच्या मनसेची स्थापना होऊन १८ वर्षे झाली, त्यांचा पक्ष आता वयात आला आहे. मात्र, इतक्या वर्षांनंतरही राज ठाकरे यांची तोफ ही फक्त उद्धव ठाकरे यांच्याविरुद्धच धडाडते. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांची किती धास्ती आहे, त्यांच्याविषयी किती भय वाटते, हे कालच्या भाषणातून दिसून आले, अशी टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाचा आपल्या नेहमीच्या शैलीत समाचार घेतला.

मी काही राज ठाकरे यांचे भाषण ऐकलेले नाही. आज सकाळी या भाषणाविषयीच्या काही गोष्टी वाचनात आल्या. राज ठाकरे यांच्या पक्षाला १८ वर्षे होऊन गेली आहेत. त्यांचा पक्ष वयात आला आहे. मात्र, १८ वर्षांनीही ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच बोलत आहेत. उद्धव ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत. राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि भाजप हे सगळेच उद्धव ठाकरेंविषयीच बोलतात. उद्धव ठाकरे सभा घेतात त्यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंचे वऱ्हाड येते. याचा अर्थ या सगळ्यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटते. राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाबद्दल बोलावे. महागाई, शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी बोलावे. पण सगळ्या तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरुद्ध धडाडतात. यावरुन राज ठाकरे यांच्यासह सगळ्यांना उद्धव ठाकरे यांची किती धास्ती आणि भय आहे, हे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी स्वत:चे काम करावे, स्वत:चा पक्ष कुठे आहे, ते पाहावे. आम्हाला आमची क्षमता आणि ताकद माहिती आहे. राज ठाकरे यांना दुसरं काही काम नसेल तर त्यांनी नाक आणि कान टोचण्याचा धंदा सुरु करावा, अशी खोचक टिप्पणीही संजय राऊत यांनी केली.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरात कारवाई; पालिकेचं पथक हातोडे घेऊन पोहोचलं दरम्यान, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर माहिमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. हे बांधकाम महिनाभरात पाडले नाही तर त्याठिकाणी आम्ही गणपतीचं मंदिर उभारू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांनी इशारा देऊन २४ तास उलटण्याच्या आधीच माहिमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. याविषयी संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले होते. शिवसेना सोडण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो. मी त्यांना विचारलं होतं की, ‘तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? घे, पण मला माझा रोल काय आहे ते सांग. मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका, जर निवडून आलेल्या लोकांची जबाबदारी घ्यायची नाही, तर पुढच्या वेळी प्रचाराला जाऊन मी काय तोंड दाखवू? उद्धव ठाकरे म्हणाले, मला काही नाही, मी म्हटलं, ठरलं ना? तर ते हो म्हणाले. त्यानंतर आम्ही घरी बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेलो. मी त्याठिकाणी गेल्यावर उद्धव ठाकरे यांना आत बोलवायला कोणाला तरी पाठवले. पण ते आतमध्ये आले नाहीत. नंतर कोणीतरी सांगितलं, उद्धव ठाकरे निघून गेले’, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला होता.