खलिस्थानवाद्यांच्या कुरघोडी प्रकरणात कारवाई नसल्याने भारताचेही ब्रिटीशांना जशास तसं उत्तर

0
184

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर विविध स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत होता. याप्रकरणी भारत सरकारने कारवाईची मागणी केली होती. मात्र, ब्रिटीश सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान आता भारतानेही ब्रिटीशांना जशास तसं उत्तर देण्यास सुरूवात केली असून केंद्र सरकारने ब्रिटीश दुतावासाबाहेरील सुरक्षेत कपात केली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने दिल्लीतील २ राजजी मार्गावर स्थित ब्रिटीश दुतावासासमोरील सुरक्षा काढून घेतली आहे. यापूर्वी या इमारतींसमोर बॅरिकेड्ससह दोन बंदुकधारी पोलीस कर्मचारी तैनात होते. मात्र, त्यांना आता हटविण्यात आले आहे. विशेष म्हणजे याठिकाणी असलेल्या अन्य देशांच्या दुतावासांसमोर सुरक्षा रक्षक तैनात आहे.

दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील खलिस्तानवादी स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग विरोधात सुरु असेलल्या कारवाईच्या निषेधार्थ खलिस्तानी समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय दुतावासासमोर आंदोलन केले होते. तसेच यावेळी खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर असलेल्या तिरंग्याचा अपमान केला होता. त्यानंतर भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, यासंदर्भातील दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

दरम्यान, केंद्र सरकारने आज उचललेलं हे पाऊल कुटनीची भाग असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील ब्रिटीश उच्च आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.