अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

0
341

मंत्र्यांना वेळ मिळेना; भाजकडून शहरवासियांना वेठीस धरण्याचा प्रकार

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आणून ते पाणी शुध्द करण्यासाठी चिखली येथे जलशुध्दीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे काम पूर्ण होऊनही मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्‌घाटनाअभावी शहरवासियांना मुबलक आणि हक्काचे पाणी मिळत नाही. प्रचंड पाणीटंचाई असतानाही केवळ प्रसिद्धीचा हव्यास आणि कामाच्या श्रेयासाठी भाजपकडून शहरातील २७ लाखांहून अधिक जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील पाणीटंचाईला जबाबदार असलेल्या प्रशासन आणि भाजपच्या नेत्यांनी ३१ मार्च 2023 पर्यंत या जलशुध्दीकरण केंद्राचे उद्‌घाटन न केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उद्घाटन करण्यात येईल आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असा इशारा अजित गव्हाणे यांनी दिला आहे.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. या पत्रकात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. ऐन पावसाळ्यात धरण तुडुंब भरलेले असतानाही शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे पाणीटंचाईमध्ये भरच पडू लागली आहे. शहरातील विविध भागातून दररोज अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या हजारो तक्रारी आहेत. याकडे प्रशासनाकडून दूर्लक्ष केले जात आहे, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.

आंद्रा व भामा आसखेड या दोन धरणातून 267 एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी शहरात पहिल्या टप्प्यात येणार आहे. यासाठी चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन चाचणीही झाली आहे. असे असताना महापालिका प्रशासन आणि शहरातील भाजपच्या नेत्यांना या जलशुध्दीकरण केंद्राच्या उद्‌घाटनासाठी मंत्र्यांना आणायचे आहे. मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने भाजपने 27 लाख लोकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप चालविले आहे. वास्तविकपणे या जलशुध्दीकर केंद्राचे काम यापूर्वीच पूर्ण झाल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी सांगत असताना फक्त प्रसिध्दीच्या हव्यासापोटी आणि श्रेयासाठी भाजपच्या नेतेमंडळींनी जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार चालविला आहे. तो तात्काळ थांबवून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन पुढील आठ दिवसांत करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा राष्ट्रवादीकडून या प्रकल्पाचे उद्घाटन करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असा इशाराही या पत्रकाद्वारे गव्हाणे यांनी दिला आहे.

सोसायट्यांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा-

शहरातील विविध सोसायट्यांना टॅकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टॅकरने पाणी विकत घेण्याची वेळ अनेक सोसायटीधारकांवर भाजपच्या मनमानी कारभारामुळे आली आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी उपलब्ध झाले असताना मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन रखडविण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासियांच्या मनात पालिका प्रशासन आणि भाजपबद्दल प्रचंड चिड निर्माण होऊ लागली आहे. तसेच हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत शहरवासिय नक्कीच जागा दाखवतील, असेही अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे.