महापालिकेतील कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही, वारंवार एसीबीच्या कारवाईमुळे शहराची बदनामी होतेय : नाना काटे यांची टीका

0
286

पिंपरी, दि.२२(पीसीबी): आज पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागात “लाचलुचपत विभागाची धाड पडली आहे. यापूर्वी स्थायी समितीमध्ये धाड पडली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभारावर व कर्मचाऱ्यावर कोणाचाही वचक नसल्यामुळे मागील सहा वर्षापासून वारंवार एसीबी कडून कारवाई होत आहे. मात्र या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदनाम होत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराचे कुराण वाढले आहे. अधिकाऱ्यांच्यावर मागील पाच वर्षे कारभार करणाऱ्या भाजपमधील नेत्यांचा कोणताही वचक नव्हता. मागील एक वर्षापासून प्रशासकीय राजवटीतही अधिकाऱ्याकडून मनमानी पद्धतीने कारभार होत असल्यामुळे अधिकारीही बेभान झाले आहेत. या सर्व घटनांमुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची खुलेआम लूट होत आहे तर दुसरीकडे वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे शहराची बदनामी होत आहे.

आज पाणीपुरवठा विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी धाड टाकली आहे. या धाडीत एक लाख रुपयाची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतला आहे. ठेकेदाराची फाईल पुढे पास करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे नामक लिपिकाने ठेकेदाराकडे केली होती. त्या ठेकेदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दिलीप आढे नामक लिपिकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही स्थायी समितीमध्ये दोन कर्मचाऱ्यांसह स्थायी समितीच्या अध्यक्षांना तुरुंगात जावे लागले होते. महापालिकेवरती वरिष्ठ नेत्यांचा अंकुश असणे गरजेचे असते. यापूर्वी आमचे नेते अजितदादा पवार यांचा धबधबा स्थानिक नेत्यावर व प्रशासनावरती होता. मात्र मागील सहा वर्षापासून भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्याकडून अंकुश ठेवला जात नाही. चुकीच्या नेतृत्वाकडे शहराची सूत्र गेल्यानंतर काय होते याची प्रचिती पिंपरी चिंचवडकरांना वारंवार येत आहे. त्यामुळे चुकीच्या प्रवृत्तीला पायाबंध घालण्याची व शहराची बदनामी थांबवण्याची मागणी नाना काटे यांनी जाहीरपणे व्यक्त केले आहे.