विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची आमची तयारी – चंद्रकांत पाटील

0
194

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) -भारतीय जनता पार्टी एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीची तयारी करत असते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची आम्ही तयारी करत आहोत. शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतील, हे आता ठरवण्याचे काही कारणच नाही. त्यांना आमची तयारी उपयोगी पडेल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय रुग्णालय, भोसरी गवळीमाथा आणि कासारवाडीतील कचरा हस्तांतरण केंद्राचे पाटील यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

विरोधकांच्या श्रेयवादाच्या फलकबाजीवर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपली भूमिका असते. तशी विरोधकांना विरोधकांची भूमिका असते. त्यांनी कुठल्याही चांगल्या गोष्टीमधून सुद्धा दुर्बीण लावून एखादा छोटा मोठा दोष शोधायचा असतो. वायसीएमधील नेत्र विभाग येथे स्थलांतरित केला जाणार आहे. या नवीन इमारतीत डोळ्यांशी संबंधित सर्व आजारांची तपासणी, शस्त्रक्रिया होतील. उद्यापासून कामकाज सुरू होईल.

जुनी पेन्शनबाबत सकारात्मक जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस असून त्याबाबत अद्याप तोडगा निघाला नसल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनबाबत सकारात्मक असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यासाठी वरिष्ठ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. माझे सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की परीक्षेचा कालावधी आहे. रुग्णांचे भयंकर हाल होत आहेत. त्यामुळे निदान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्यात. कोणत्याही संपाचे दोन भाग असतात. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करायचे असते. बाकीच्यांनी संप करायचा असतो. पण, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही संपात उतरले आहेत. त्यांच्या घरातही कोणीतरी आजारी पडले. सरकार जुनी पेन्शन योजनेबाबत नकारार्थी नाही. त्याचा भार किती पडेल याचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागेल.