जीवे मारण्याची धमकी देऊन अपहरणाचा प्रयत्न

0
179

शिरगाव दि. १९ (पीसीबी) – घरात घुसून चौघांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करून घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्या व्यक्तीला कारमध्ये घालून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री मावळ तालुक्यातील साळूंब्रे येथे घडली.

मंगेश निवृत्ती दोंड (वय ३३, रा. साळूंब्रे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सचिन दोंड याच्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून आरोपी कारमधून फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी घरात घुसून फिर्यादीस शिवीगाळ करून घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला धक्काबुक्की करून कार मध्ये बसवून घेऊन जाऊ लागले. त्यावेळी फिर्यादी पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव परंदवडी पोलीस तपास करीत आहेत.