पुणे, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेकडून तीन वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना आता आपले आदर्श बदलले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले नेते म्हटले आहे. भाजपने शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून विशेष लक्ष केंद्रीत केल्याने आढळराव पाटील यांची मोठी कुचंबना झाली आहे. अशाही परिस्थितीत महाआघाडीचा एकच उमेदवार समोर असला तरी मला जिंकण्याची पूर्ण खात्री असल्याचा दावा ते करतात. `सरकारनामा` दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेत दाखल झाल्यानंतर खासदारकीसाठी ते पुन्हा इच्छुक आहेत, अशी चर्चा होती. मात्र शिरूरवर भाजपनेही दावा सांगितल्याची चर्चा होती. यावेळी त्यांनी शिरूरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मी केवळ खासदारकीसाठी शिंदे गटात आलो या म्हणण्यात तथ्य नाही, असे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले.
मुलाखतीत त्यांनी आगामी निवडणुकीबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, “आता तुम्ही एकनाथ शिंदेंसोबत आलात. भाजपने ही शिरूरवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीत तुमची अडचण होईल, असे वाटत नाही का? भाजपने शिरूरवर दावा केला तर तुम्ही काय करणार?” असा प्रश्न आढळरावांना विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना आढळराव म्हणाले, “भाजपने शिरूरवर दावा केला, असा ठोस पुरावा नाही. चर्चा, अफवा या गोष्टी चालतच राहतात. ज्यावेळी आम्ही १३ खासदार शिंदेकडे गेले. त्या प्रक्रियेत मी सोबतच होतो. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या त्या जागा शिवसेनेलाच मिळणार, त्या शिवसेनाच लढणार, हे ठरलं आहे.”
पुढे आढळराव म्हणाले, ‘मी शिंदेकडून कुठलाही शब्द घेतला नाही. कोणतीही अट ठेवली नाही. माझ्या दृष्टीने खासदार होणं एवढं महत्त्वाचं नाही. आज चार वर्षे झाले, खासदार नाही. तरी खासदारांपेक्षा जास्त कामे करतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतसुद्धा मला कुठे शब्द होता ? मीच म्हणत होतो, कशाला राष्ट्रवादीबरोबर संघर्ष करताय,” असे आढळराव म्हणाले.
मुलाखतीत आढळराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की, “आगामी लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढवली तर एका सर्व्हेनुसार ४८ पैकी ४० जागा महाविकास आघाडी जिंकेल. अशा परिस्थितीत शिरूरमध्ये तुम्ही भाजप शिवसेना युतीचे उमेदवार राहिलात, तर खरोखर तुमचा टिकाव लागू शकेल का?
“यावर उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, “मला पूर्ण खात्री आहे की, कुठल्याही परिस्थितीत मी लढलो किंवा शिवसेना – भाजप युतीचा कोणीही उमेदवार शिरूरमधून लढलो, तर शंभर टक्के निवडून येण्याची पूर्ण खात्री आहे. मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की, निवडून येण्याची मला पूर्ण खात्री आहे,” असा विश्वास आढळराव पाटलांनी व्यक्त केला. ”
आढळराव पाटील म्हणाले, ” ज्यावेळी आम्ही १३ खासदार शिंदेकडे गेलो त्या प्रक्रियेत मी सोबतच होतो. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या त्या जागा शिवसेनेलाच मिळणार, त्या शिवसेनाच लढणार, हे ठरलं आहे.”