मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते पुताळ्याचे अनावरण करा – महात्मा बसवेश्वर पुतळा समितीची मागणी
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – महात्मा बसवेश्वर पुतळा समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळील मोकळ्या जागेत उभारलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते या पुताळ्याचे लवकरात लवकर अनावरण करावे, अशी आग्रही मागणी पुतळा समितीने महापालिका प्रशासनाकडे केली. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना लेखी पत्र दिले आहे.
समितीचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, कार्याध्यक्ष शिवाजी साखरे, अण्णाराय बिरादार, गुरुराज चरंतीमठ हे निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
अध्यक्ष नारायण बहिरवाडे म्हणाले, जगातील पहिली लोकशाही महात्मा बसवेश्वर महाराज यांनी रुजविली. इंग्लंडच्या संसदेबाहेर देखील महात्मा बसवेश्वर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे अनावरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अशा महामानवाचा पुतळा पिंपरी-चिंचवड शहरात असावा अशी मागणी शहरातील विरशैव लिंगायत समाजातील बांधवांनी केली होती.
त्यासाठी पुतळा समितीची स्थापना केली. लिंगायत समाजातील सर्व घटकांकडून लोकवर्गणीतून महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बनवून घेतला. शिल्पकार पंकज तांबे यांनी अतिशय सुबक पुतळा बनविला आहे. यासाठी 27 लाख रुपये खर्च आला. या पुतळ्याविषयी आपुलकी राहावी यासाठी लोकवर्गणीतून पुतळा बनविण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी समितीने महापालिकेकडे जागा मागितली. त्याबाबत महापालिका सभेत 20 मे 2016 रोजी ठराव मंजूर करण्यात आला.
त्यानुसार निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळील 45 मीटर स्पाईन आणि बीआरटी रस्त्याच्या जंक्शनजवळ असलेली मोकळी जागा महापालिकेने उपलब्ध करुन दिली. या जागेत चौथारा, परिसर सुशोभिकरण करण्यासाठी सल्लागार सचिन शहा यांची महापालिकेने नेमणूक केली. चौथा-याच्या आराखड्यास राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तू शास्त्रज्ञ यांची मान्यता मिळालेली आहे. पुतळ्यास शासनाच्या कला संचालनलायाची परवानगी देखील मिळालेली आहे. पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग, महावितरण, तत्कालीन प्राधिकरण यांच्या सर्व मान्यता आणि ना-हरकत प्रमाणपत्र देखील घेतले आहे. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी पुतळा बसविण्यास मान्यता दिली.
शिल्पकार पंकज तांबे यांनी साडेचार वर्षात ब्रॉंझच्या धातुचा महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बनविला आहे. हा पुतळा इष्टलिंग धारक आहे. बारा फुट उंचीचा हा पुतळा आहे. लिंगायत समाजाचे आराध्यदैवत महादेवाची प्रतिकृती उभारली आहे. सुर्यप्रभाकृती देखील उभारली आहे. महात्मा बसवेश्वर महाराज यांनी केलेल्या कार्याचे म्युअरल्स देखील बसविण्यात आले आहेत. हा पुतळा चौथा-यावर बसवून महापालिकेकडे सुपुर्द केला आहे. पुतळा परिसराचे सुशोभीकरण, बागेची निर्मिती, वृक्षारोपण करण्यात आले आहे. विद्युत रोषणाई देखील केली आहे. सीमाभिंत उभारली आहे. या पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण करावे अशी मागणी समितीने महापालिकेकडे केली.
या पुतळा अनावरण सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, प्रभागातील माजी लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करावे, अशी विनंतीही समितीने महापालिका प्रशासनाकडे केली.