पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचे नोबेल?; पुरस्कार समितीच्या सदस्याच्या विधानामुळं चर्चा

0
210

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा नोबेल शांतता पुरस्कारासाठी विचार केला जात असल्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. या चर्चेला अधिक हवा देऊ नका,’ असा खुलासा नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य अ‍ॅस्ले तोजे यांनी केला आहे.

अ‍ॅस्ले तोजे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांची स्तुती केली होती. त्यावरून पंतप्रधान मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. अ‍ॅस्ले तोजे यांच्या विधानाचा हवाला त्यासाठी देण्यात आला होता. मात्र, ही सर्व चर्चा तोजे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.

‘एक खोडसाळ ट्वीट कोणीतरी प्रसिद्ध केलं. त्याबद्दल अधिक चर्चा करून त्याला हवा दिली जाऊ नये, असं तोजे म्हणाले. ‘नॉर्वेजियन नोबेल शांतता समितीचा प्रतिनिधी म्हणून मी भारत दौऱ्यावर आलेलो नाही. भारताचा मित्र म्हणून मी इथं आलो आहे. माझ्या दौऱ्याचा नोबेल पुरस्काराशी संबंध नाही, असं त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मात्र त्यांनी कौतुकोद्गार काढले. रशिया व युक्रेन युद्धाबाबत भूमिका मांडताना पंतप्रधान मोदी यांनी परखड भूमिका मांडली होती. हे युद्धाचं युग नाही, असं त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना सुनावलं होतं. त्याबद्दल तोजे यांनी मोदींचं कौतुक केलं. त्यांचे हे उद्गार आशेचा किरण आहेत. आजच्या जगात मतभेद मिटवण्याची ही पद्धत नाही हे भारतानं मोदींच्या माध्यमातून अधोरेखित केलं होतं. मोदींच्या भूमिकेला जगातील बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे, असं तोजे म्हणाले.

‘भारतानं कधीच कोणाशी चढ्या आवाजात चर्चा केली नाही किंवा कोणाला धमकावलेलं नाही. भारत नेहमीच आपली भूमिका अत्यंत सौम्यपणे व मैत्रीच्या वातावरणात मांडत आला आहे. भारत ही जगातील एक मोठी शक्ती आहे आणि या शक्तीची आंतरराष्ट्रीय राजकारणात जास्त गरज आहे,’ असं तोजे म्हणाले.