अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील विविध भागात महाविकास आघाडीकच्या सभा

0
349

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील विविध भागात महाविकास आघाडीकडून सभा घेण्याच नियोजन पूर्ण झाले आहे. त्यानुसार आपापल्या भागातील सभा यशस्वी होण्यासाठी रणनितीबाबत महाविकास आघाडीकडून मुंबईतील बी. वाय चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये उपस्थितांना ‘चार्ज’ केले. कितीही कडक ऊन, अवकाळी पाऊस, वादळ आले किंवा पाऊस पडला तरी या सभा होणारच, असा निर्धार महाविकास आघाडीच्या वतीने अजित पवार यांनी केला.

सुरुवातीच्या सभा कडक उन्हात होत आहेत. आमरावतीतील सभा पावसाळ्यात होत आहे. मात्र पावसातील सभा आपल्याला फायद्याचीच ठरते, अशी मिश्किल टिपण्णी करून पवार यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेची आठवण करून दिली.

या बैठकीत राज्यातील नियोजित सभांबाबत रणनितीवर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर काय घडू शकते हे राज्यात झालेल्या पाच विधानपरिषद आणि आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यातील सभा म्हणजे महाविकास आघाडीतील एकी वाढविणे हा आहे. तसेच या सभांच्या माध्यमातून राज्यातील प्रश्नांवर आवाज उठविण्यात येणार असल्याचेही पावर यांनी यावेळी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, “शिवसेना कुणाची याबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडी बळकट होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात ठरविलेल्या भागात ना भूतो ना भविष्य अशा सभा होणे गरजेचे आहे. त्यासाठी कुटुंब म्हणून महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे.”

यानंतर पवारांनी राज्यात कोणत्या भागात किती तारखेला, कुणाच्या नेतृत्वात सभा होणार यांची माहिती दिली. राज्यातील नियोजित सभा उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला होणार असल्याचीही जाणीव करून दिली. तसेच काहीही झाले तरी सभा होतील, असा निर्धारही व्यक्त केला.

या सभांना २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सुरूवात होणार आहे. मराठवाड्यात होणाऱ्या या सभेचे नेतृत्व ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे करणार आहेत. त्यानंतर दुसरी सभा १६ एप्रिल रोजी नागपूर येथे होणार आहे. विदर्भात होणाऱ्या सभेची जबाबदारी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर सोपविली आहे.

कामगार दिनादिवशी म्हणजे १ मे रोजी मुंबई सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सभेची संपूर्ण जबाबदारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पार पाडणार आहेत. यानंतर १४ मे रोजी पुणे येथे होणाऱ्या सभेची जाबाबदारी अजित पवार यांच्याकडे आहे.कोल्हापूर येथे २८ मे रोजी होणाऱ्या सभेची जाबाबदारी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडे आहे.

नाशिक विभागाची सभा ३ जून रोजी होणार आहे. त्याची जाबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे आहे. आमरावती येथे ११ जूनला होणाऱ्या सभेची जबाबदारी काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सभेचे नियोजन सांगितल्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सभा यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच या सभांच्या माध्यमातून राज्यातील प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.

पवार म्हणाले, “अर्थसंकल्पात घोषणा झाल्या असल्या तरी राज्यात महागाई वाढत आहे. बेरोजगारीचा मुद्दा कायम आहे. ७५ हजार नोकऱ्यांची घोषणा झाली मात्र त्याबाबत अद्याप काम सुरू झाले नाही. पोलिसांवर हल्ले वाढलेले आहेत. कामगारांसाठी जुनी पेन्शन योजना महत्वाची असूनही त्याकडे सरकार लक्ष देताना दिसत नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही, असे अनेक समस्यांमुळे नागरिकांत नाराजी आहे. हे प्रश्न सभांमधून उपस्थित केले जातील. त्यामुळे महाविकास आघाडी एक कुटुंब अशी भावना मनात ठेऊन आता आपापल्या भागात कामाला सुरुवात करा.
मविआच्या सभा कधी आणि कुठे?
पहिली सभा- 2 एप्रिल 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सभा होईल. मराठवाडा विभागासाठी ही सभा असेल. तर शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्यावर सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दुसरी सभा- 16 एप्रिल 2023 रोजी नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी सभा होईल. सुनिल केदारे यांच्यावर या सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तिसरी सभा-1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत तिसरी सभा होईल. या सभेची जबाबदारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इथे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आदी सर्व परिसरातील कार्यकर्ते जमा होतील.
चौथी सभा- 14 मे 2023 रोजी रविवारी पुण्यातली सभा होईल. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्यावर असेल. पुण्यातील शेकाप, समाजवादी पक्ष, सगळ्यांना सभेसाठी आमंत्रित केलं जाणार आहे.
पाचवी सभा- 28 मे 2023 रोजी रविवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीची सभा होईल. सतेज उर्फ बंटी पाटील हे पुढाकार घेतील.
सहावी सभा- 3 जून 2023 रोजी नाशिकमध्ये शनिवारी पुढची सभा होईल. या ठिकाणी नंदुरबार, धुळे, नाशिक जळगाव आदी ठिकाणचे कार्यकर्ते नागरिक जमा होतील. या सभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर असेल.
सातवी सभा- 6 जून 2023 रोजी अमरावतीत होणार आहे. या सभेची जबाबदारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मृग नक्षत्राच्या आधीचा हा दिवस असल्याने यावेळी पावसाची शक्यता आहे. पावसातील सभा ऐतिहासिक होतात. त्यामुळे काहीही झालं तरी सभा होणारच, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय