शिवसेनेची गळती कायम, माजी आमदाराचे कुटुंब शिंदे गटात

0
185

पुणे, दि. १५ (पीसीबी) : ठाकरे गटातील पडझड अजूनही थांबलेली नाही. ठाकरे गटातून अनेक नेते सोडून जात आहेत. यात आमदार तर आहेच पण माजी नगरसेवकही आहेत. याशिवाय इतर पदाधिकारीही आहेत. आता तर एका माजी आमदाराच्या कुटुंबानेही ठाकरे गटाची साथ सोडली आहे. खेड आळंदीतील हे माजी आमदाराचं कुटुंब आहे. त्यामुळे खेड आळंदीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. तसेच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओढा काही कमी होताना दिसत नाहीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: खेड आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषाताई सुरेश गोरे आणि त्यांचे बंधू नितीन गोरे यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं स्वागत केलं. मनीषा सुरेश गोरे आणि नितीन गोरे यांचे मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. नितीन, मनीषाताई आणि त्यांचा परिवार बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. खेड आळंदी चाकणमध्ये रॅली काढली आणि हा मोठा प्रवेश झाला. एक मोठी ताकद चाकणमध्ये पाहायला मिळणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना अनेक लोक येत आहेत. हे आपल्या सर्वांचे सरकार आहे. गेल्या सात आठ महिन्यात जे निर्णय घेतले ते सर्वांच्या हिताचे आहेत. त्याचप्रमाणे आपण सादर केलेला बजेट देखील सर्वसमावेशक आहे. आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. अनेक प्रकल्प पुढे नेण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. चाकणमध्ये वाढीव दरवाढ होणार नाही. कारण त्यात काही त्रुटी आहेत त्या दूर होईपर्यंत दर वाढ होणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

या सर्वांचा प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल माजी आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई सुरेश गोरे, बंधू नितीन गुलाबराव गोरे, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड सदस्य, जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई श्रीकांत कड, वकील विजयसिंह बाबासाहेब शिंदे, सभापती दत्ताशेठ भेगडे, माजी पंचायत समिती सदस्य मछिंद्र गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काळूरामशेठ कड, खेड तालुका अध्यक्ष बिपिनशेठ रासकर, चाकण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष मंगलताई गोरे, स्नेहलताई जगताप, चाकण नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय गोरे, वकील प्रकाश लक्ष्मण गोरे, ऋषिकेश झगडे, नगरसेवक निलेश बबन गोरे, प्रविण शांताराम गोरे, सुजाताताई मंडलिक, महेश मोरेश्वर शेवकरी, नयनाताई झनकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष माऊली चिमाजी सातकर, भगवान पोखरकर, राजू जवळेकर आणि अशोक भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.