बनावट फायर सेफ्टी प्रमाणपत्राद्वारे फसवणूक

0
257

चिंचवड, दि.११ (पीसीबी) – चिंचवड येथील एका शैक्षणिक संस्थेचे फायर सेफ्टी प्रमाणपत्र शासकीय पद्धतीने काढून ते सीबीएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम दिलेल्या व्यक्तीने बनावट कागदपत्रे बनवून ती अपलोड करत शाळा आणि महापालिका यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते ३१ मे २०२२ या कालावधीत एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड येथे घडला.

शिवप्रकाश श्यामसुंदर आसोपा (वय ३२, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल मदान (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या हिंद चॅरिटेबल ट्रस्टच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल या शैक्षणिक संस्थेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अधिकृत फायर सेफ्टी प्रमाणपत्र काढून ते सीबीएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम अनिल मदान यास दिले होते. मदान याने योग्य त्या शासकीय पद्धतीने फायर सेफ्टी प्रमाणपत्र काढून ते सीबीएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक होते. तरी देखील त्याने बनावट फायर सेफ्टी प्रमाणपत्र तयार करून शैक्षणिक संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.