महावितरणच्या प्रगतीमध्ये महिलाशक्तीचेही मोठे योगदान मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे गौरवोद्गार

0
261

पुणे, दि. ११ (पीसीबी) – अत्यंत धकाधकीच्या विद्युत क्षेत्रामध्ये देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणच्या प्रगतीमध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या महिलांनी मोठे योगदान दिले आहे. काळानुरुप आव्हाने स्वीकारण्यासाठी सक्षम असल्याचेही महावितरणमध्ये आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवरून महिलांनी सिद्ध केले आहे असे गौरवोद्गार महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी काढले.

जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी (दि. ८) महावितरणकडून रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या ‘प्रकाशदीप’ सभागृहात पुणे परिमंडलातील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत व सतीश राजदीप, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, देशात सर्वप्रथम महावितरणने महिलांना तांत्रिक कर्मचारी म्हणून नियुक्तीची संधी दिली. या संधीचे सोने करीत विद्युत सहायक, तंत्रज्ञ आदी पदांवरील निवड महिला कर्मचाऱ्यांनी स्वकर्तृत्वाने सार्थ ठरविली आहे. यासोबतच महिला अभियंता, अधिकारी तसेच इतर संवर्गातील महिला कर्मचारी हे देखील महावितरणच्या ग्राहकसेवेसह प्रशासकीय कामांची विविध जबाबदारी समर्थपणे पूर्ण करीत आहेत असे श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी महावितरणमधील महिला नाट्यकलाकारांनी ग्राहकसेवेच्या विविध योजनांवर आधारित पथनाट्य सादर केले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच भावना विजय प्रसादे यांनी ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. सुजित वेताळ व अनुष्का जोशी यांनी महिलांसाठी स्वसंरक्षणाबाबत प्रबोधन केले. तर रमेश मोकाशी व कावेरी अडसुळे यांनी महिलांच्या आर्थिक नियोजनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी व भक्ती जोशी यांनी केले. कार्यक्रमाला उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर यांच्यासह महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.