प्रामाणिकपणे शास्ती भरणार्‍यांची रक्कम पुढील बिलात समायोजित करा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची आयुक्तांकडे मागणी…

0
334

पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) – शास्तीकर प्रामाणिकपणे भरणार्‍या करदात्यांबद्दल शासन आदेशामध्ये अन्याय करणारी भूमिका घेतली आहे. प्रामाणिक करदात्यांची रक्कम त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क असल्यामुळे आतापर्यंत ज्या करदात्यांनी आपली शास्तीची रक्कम भरली आहे त्या करदात्यांनी भरलेली रक्कम त्यांच्या पुढील करामध्ये समायोजित करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

याबाबत अजित गव्हाणे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, राज्य शासनाने शास्तीकर रद्द करण्याऐवजी आतापर्यंत शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आजपर्यंत ज्या प्रामाणिक करदात्यांनी आपली शास्तीची रक्कम भरली त्यांच्याबाबतीत कोणताही विचार करण्यात आलेला नाही. वस्तुत: प्रामाणिकपणे शास्तीची रक्कम भरणार्‍या करदात्यांना न्याय देण्याचा विचार करून या करदात्यांनी भरलेली रक्कम पुढील मुळ करामध्ये समायोजित करण्याबाबत शासनाने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, तसा निर्णय घेण्यात न आल्यामुळे प्रामाणिक करदात्यांमध्ये अन्यायाची व नाराजीची मोठी भावना निर्माण झाली आहे.

या प्रामाणिक करदात्यांना न्याय देणे ही आपली जबाबदारी असून नैसर्गिक न्याय तत्त्वास धरून आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी यापूर्वी प्रामाणिकपणे शास्ती भरलेली आहे, अशा नागरिकांनी भरलेल्या शास्तीकराची रक्कम ही त्यांच्या यापुढील मिळकत कराच्या बिलांमध्ये समायोजित करण्यात यावी, असेही या निवेदनात गव्हाणे यांनी म्हटले आहे.