कासारवाडीत कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लुटले

0
217

कासारवाडी, दि. ८ (पीसीबी) – कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जखमी करत मोबाईल फोन आणि पैसे जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास गोदरेज कंपनी, वल्लभनगर पिंपरी येथे घडली.

विमलेश कुमार सत्यनारायण रावत (वय २९, रा. कासारवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वल्लभनगर येथील गोदरेज कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास ते कंपनीत काम करत असताना तीन ते चार अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादीकडे पैसे आणि मोबाईल फोनची मागणी केली. त्यास फिर्यादींनी नकार दिला. त्यावरून त्यांच्या डोक्यात अवजड हत्याराने मारून आरोपींनी जखमी केले. त्यानंतर फिर्यादीचा पाच हजारांचा मोबाईल फोन आणि ७०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.