वाकड, दि. ८ (पीसीबी) – भरधाव वेगात ट्रिपलसीट जात असलेल्या बुलेट चालकाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात बुलेट चालकाचा मृत्यू झाला. बुलेटवरील दोन सहप्रवासी तरुण आणि दुसऱ्या दुचाकीवरील एकजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 5) सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास वाकड फाटा बीआरटी बस थांबा जवळ घडला.
किशोर हनुमंत जोगदंड (वय 28, रा. रहाटणी) असे मृत्यू झालेल्या बुलेट चालकाचे नाव आहे. विकास शेळके, श्रीकृष्ण नारनाळे, देवेंद्र कापसे अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक श्रीकांत गायकवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर जोगदंड हा त्याच्या बुलेट (एमएच 14/केएम ७७१८) वरून भरधाव वेगात जात होता. त्यावेळी त्याच्या बुलेटवर श्रीकृष्ण आणि विकास हे दोघेजण बसले होते. किशोर याने वाकड फाटा येथे देवेंद्र कापसे यांच्या दुचाकीला (एमएच 12/टीजी 1937) जोरात धडक दिली. त्यात किशोरचा मृत्यू झाला. त्याच्या बुलेटवरील सह प्रवासी विकास आणि श्रीकृष्ण तसेच दुसऱ्या दुचाकीवरील देवेंद्र हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.











































