पेट्रोल भरण्यास वेळ लागल्याने तरुणास बेदम मारहाण

0
343

परंदवाडी, दि. ८ (पीसीबी) – बाटलीत पेट्रोल घेतल्यानंतर ऑनलाईन पैसे देण्यासाठी अडचण आल्याने तरुण पेट्रोल पंपावरील कामगारासोबत बोलत थांबला. त्यावेळी त्याच्या पाठीमागे असलेल्या कार चालकाला पेट्रोल भरण्यास वेळ लागल्याने त्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. ७) सायंकाळी भोतेवस्ती, परंदवडी येथे एच पी पेट्रोल पंपावर घडली.

दीपक रामदास देवरे (वय २५, रा. बेबडओहोळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक हे त्यांच्या दुचाकीवरून बेबडओहोळ येथे जात असताना भोतेवस्ती येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला पार्क केली आणि बाटलीमध्ये पेट्रोल घेण्यासाठी पंपावर गेले. तिथे त्यांनी बाटलीत पेट्रोल घेतले. मात्र पैसे देताना तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ऑनलाईन पैसे देण्यास वेळ लागला. त्यामुळे दीपक यांनी नंतर पैसे देऊन पेट्रोल घेऊन जातो, असे सांगितले. त्यावेळी दीपक यांच्या पाठीमागे कारमध्ये असलेल्या एकाने खाली उतरून दीपक यांना शिवीगाळ केली. त्यांना समजावत असताना कार मधील व्यक्तीने दीपक यांना लोखंडी रॉडने कानावर मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.