अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सूचना; नाना काटे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

0
272

पिंपरी, दि. ०६ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिला आहे. आपल्यासाठी संधी असतानाही त्याचे विजयात रुपांतर झाले नसले तरी खचून न जाता या निवडणुकीपेक्षाही अधिक जोमाने पुढील निवडणुकीच्या तयारी लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाना काटे यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना दिल्या.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक सुहास उभे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, माजी आमदार उल्हास पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग निहाय माहिती घेतली. कोणत्या प्रभागात किती मते पडली, कोणी-कोणी काम केले, आपल्यासाठी परिस्थिती सकारात्मक असतानाही आपण कोठे कमी पडलो यासह निवडणुकीतील प्रत्येक बारकाव्यांबाबत माहिती घेतली. यावेळी नाना काटे यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी संपूर्ण माहिती दिली. भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर, पैशांचा वापर, कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिलेला त्रास यासह सर्व माहिती दिली.

सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीसाठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. लोकांनाही आता बदल हवा असल्याने आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागणार आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून अधिक जोमाने येणार्‍या महापालिका निवडणुकींच्या तयारीला आतापासून लागा. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेऊयात, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.