पुणे, दि. ०५ (पीसीबी) – राजस्थान मधून विक्रीसाठी आणलेले अफिम अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथे पकडले. दोन लाख रुपयांच्या अफिमसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ४) दुपारी शिक्षक सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.
दिनेश रामेश्वर लाल जाट (वय २५, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे मधील शिक्षक सोसायटीमध्ये राहणारा एकजण अफिम विक्री करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दिनेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख पाच हजार ६०० रुपयांचे ५१४ ग्रॅम अफिम, १४ हजारांचा मोबाईल फोन आणि ५५ हजारांची दुचाकी असा एकूण दोन लाख ७४ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
दिनेश याने अफिम त्याच्या गावाकडील साथीदार दीपक सुथार (रा. बडीसादरी, जि. चितोडगड, राजस्थान) यांच्याकडून आणला होता. हा अफिम दिनेश तळेगाव दाभाडे परिसरात विक्री करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.