मग रासने का नको……?

0
199

पुणे, दि. ०५ (पीसीबी) – कसब्याच्या निकालानंतरचं कवित्व अद्याप थांबलेलं नाही. काही विशिष्ट पत्रकारांचे लेख सोशल माध्यमातून पसरवले जात आहेत. या लेखांमधून ‘ उमेदवारी नाकारून ब्राह्मण समाजावर कसा अन्याय झाला….! त्यामुळंच भाजपला पर्यायानं हेमंत रासनेंना पराभव स्वीकारावा लागलाय…!’ हे अशा लेखातून व्यक्त केली जाणारी मतं वस्तुस्थिती लपवणारी आहे. भाजपच्या पराभवाचे विश्लेषण आणि मतदारसंघातली वस्तुस्थिती अत्यंत वेगळी आहे. कसबा पेठ पुणे, ही मध्यमवर्गीयाची वस्ती, मूळ पुणं, प्रत्येक गावात कसबा असतो. तसा हा कसबा म्हणजे मूळ वस्ती नदीकाठी पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी वसलेली नागरी वसाहत, त्यात राहणारे प्रामुख्याने मध्यमवर्गीय! अशा या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय-मोतीबाग आहे, संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण, ग्राहकपेठ आणि इतर संस्था यांची मुख्य कार्यालयं आहेत, ज्या भागाला रामभाऊ म्हाळगी, अण्णा जोशी, अरविंद लेले, गिरीश बापट, मुक्ता टिळक अशी नेतृत्वाची उज्ज्वल परंपरा आहे, इथूनच तरुण भारत, एकता यासारखी संघविचारांची नियतकालिकं वर्षानुवर्ष प्रसिध्द होत असत, ज्या भागात संघाच्या अनेक शाखा आहेत, त्यांच्याच अधिपत्याखालील नामवंत शिक्षणसंस्था, शाळा, महाविद्यालये, सहकारी बॅंका आहेत. त्याच भागातल्या पारंपरिक भाजपच्या सुजाण मतदारांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला असा सहजसोपा विजय मिळू द्यावा हे शहरातल्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या याच भागावर रासने अवलंबून होते, मात्र तिथल्या पारंपरिक मतदारांनीच त्यांचा घात केला. ज्या ‘पन्नाप्रमुखा’नी मतदारसंघाची बुथनिहाय रचना, जातीची समिकरणं आपल्या वरिष्ठांसमोर मांडली होती. शिवाय पक्षाची सूत्रं हाती असलेल्या पालकमंत्र्यांनी उमेदवार निवडीसंदर्भात जो सर्व्हे केला होता त्यानुसार शनिवार, नारायण, सदाशिव पेठ हा भाग ब्राह्मण बहुल मतदारांचा आहे. ही पारंपरिक मतं मिळाली तर, रासने सहज विजयी होतील असा विश्वास दिला होता. यापूर्वी इथूनच यापूर्वीच्या जनसंघ-भाजपच्या उमेदवाराला लीड- मताधिक्य मिळालेलं होतं. यंदा मात्र इथं दगाफटका झाला. रासनेंना ती मतं मिळालीच नाहीत हे मतमोजणीची आकडेवारी पाहिली की, लक्षात येतं. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा संघ-भाजपच्या मुशीतला  ब्राह्मण बहुल मतदार असलेला ‘शुक्रवार पेठ मतदारसंघ’ विभाजित झाला. त्यावेळी रामभाऊ म्हाळगी तिथून निवडून येत असत. पुनर्रचनेनंतर शनिवार, नारायण, सदाशिव पेठ हा ब्राह्मण बहुल मतदारांचा भाग कसब्यात आला. विभाजनानंतर शुक्रवार पेठ मतदार संघाचं अस्तित्व संपुष्टात आलं. त्यानंतर कसबा मतदारसंघातून वसंत थोरात, उल्हास काळोखे यांचा अपवाद वगळता रामभाऊ म्हाळगी, कसब्यातून दोनदा अरविंद लेले, एकदा अण्णा जोशी, त्यानंतर गिरीश बापट पाचवेळा आणि मुक्ता टिळक हे भाजप नेते आमदार झाले. या प्रत्येकवेळी कसब्यातल्या बहुजन समाजाच्या मतदारांनी उमेदवारांची जात न पाहता ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला मतं दिली. त्यांना निवडून आणलं. मात्र प्रथमच भाजपनं बहुजन ओबीसी समाजातल्या हेमंत रासनेंना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र ब्राह्मण बहुल भागातून अपेक्षित पारंपारिक मतं न मिळाल्यानं रासनेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे आपल्या समाजाचा उमेदवार असेल तरच भाजपला मतदान होईल अन्यथा नाही. हे दाखवून दिलं!

खासदार गिरीश बापटांनी हा मतदारसंघ बांधला होता असं जे म्हटलं जातंय ते ही फारसं बरोबर नाही. कारण बापटांनी या मतदारसंघातून भाजपचा कोणताच कार्यकर्ता उभा केला नाही. जे उभं राहण्याची खटपट करत होते त्यांना संपविण्याचा प्रयत्न झालाय. त्यांचा स्वतःचा असा एकही कार्यकर्ता या भागात नाही. त्यांचे सर्व पक्षात मैत्रीचे संबंध होते. त्याचा ते वापर करीत. शिवाय शिवसेनेसोबत युती असल्यानं शिवसैनिक त्यांच्या विजयासाठी झटत असत. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीतले मित्र मदतीला येत असत. शिवाय तिरंगी लढत व्हावी असा ते प्रयत्न करीत.  त्यामुळं त्यांना यश सहज साध्य होत असे. असं सारं असलं तरी हेमंत रासने ज्या पारंपरिक आणि हक्काच्या मतदारांवर विसंबून होते, त्या शनिवार, नारायण, सदाशिव पेठेतल्या मतदारांनी त्यांचा आणि पक्षाचा विश्वासघात केला.

भाजपच्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशीही चर्चा आहे की, “रासने केवळ वर्ष-दीड वर्षासाठी निवडून आले तर पुढची पाच वर्षांची संपूर्ण टर्म रासनेंनाच द्यावी लागेल. त्यावेळी ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. त्यामुळं आताच रासनेंना रोखायला हवंय असा विचार पारंपरिक मतदारांनी केल्याची चर्चा आहे. आधीच कोथरूड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांची आमदारकी हिसकावून घेतली गेलीय ती चंद्रकांत पाटलांना दिलीय. आता कसब्यातूनही ब्राह्मण कार्यकर्त्याला हुसकावून लावलंय. कधीकाळी दोन दोन आमदार असलेल्या पुण्यात आज एकही ब्राह्मण आमदार नाही. याचं समाजाला शल्य आहे. त्यामुळं भाजपला हिसका दाखवायचा म्हणून मतदानाला हे पारंपरिक मतदार बाहेर पडले नाहीत. जे पडले त्यांनी विरोधात मतदान केलं असावं. मात्र त्याची सजा सरळमार्गी, शांत, सोशिक आणि निष्ठेनं पक्षाचं काम करणाऱ्या हेमंत रासनेंना मिळाली. पक्षांतर्गत जातीय राजकारणात बिचाऱ्या रासनेंचा बळी दिला गेलाय!”
– हरीश केंची.