बँकेने लिलाव केलेल्या मालमत्तेवर ताबा, बँकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी

0
183

निगडी, दि. ३ (पीसीबी) – बँकेने लिलाव केलेल्या घरातील साहित्य मिळण्यासाठी पूर्वीच्या घरमालकाने बँकेकडे विनंती केली. त्यानुसार बँकेने त्यास घरातील साहित्य देण्याचे मान्य केले. साहित्य देण्यासाठी बँकेचे अधिकारी आले असता त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्या व्यक्तीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून घरावर बेकायदेशीरपणे ताबा मारला. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तोरणागड प्राधिकरण निगडी येथे घडली.

उमेश किसन महाजन (वय ५६, रा. बदलापूर पश्चिम ठाणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील सुभाष कणसे (रा. प्राधिकरण निगडी), अमित हरिभाऊ शेवाळे, भूषण रवींद्र पाटील, अक्षय बाबुराव शिंगोटे, झांबरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि अन्य चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील कणसे यांनी प्राधिकरण निगडी येथील त्यांच्या रो हाऊसवर दि सातारा सहकारी बँक लि. शाखा मालवणी मालाड येथून ४० लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले. काही दिवस हप्ते भरून पुन्हा कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेने कणसे यांच्या रो हाऊसचा ताबा घेतला. बँकेने घराचा लिलाव केला. त्यानंतर कणसे यांनी घरातील साहित्य परत मिळण्यासाठी विनंती केली. त्यामुळे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता बँकेचे अधिकारी, कर्मचारी लिलाव केलेल्या घरात आले. त्यावेळी कणसे यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत मिळून बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी करत त्यांना घराबाहेर काढले. बँकेचा कायदेशीर ताबा असताना कणसे आणि साथीदारांनी जबरदस्तीने घराचा ताबा घेतला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.