पूर्वी १.१२ लाख मते घेणाऱ्या राहुल कलाटे यांचे यावेळी डिपॉझिट जप्त

0
308

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आघाडीतील ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे हे तेथील आघाडी (राष्ट्रवादी कॉंग्रेस) उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरले. मात्र, आघाडीला हा जोर का धीरे से देणाऱ्या कलाटेंनाही तो त्यांचे डिपॉजिट जप्त झाल्याने बसला आहे. आघाडीचे नाना काटे वगळता कलाटेंसह चिंचवड मतदारसंघातील इतर सर्व २६ उमेदवारांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉजिट जप्त झाले आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या चिंचवड मतदारसंघात ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदान केले.त्याच्या एक षष्टांश म्हणजे १६.६ टक्के मते (४७ हजार ६६६) अनामत शाबूत राहण्यासाठी मिळणे गरजेचे होते.हा कोटा फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे यांनी पूर्ण केला.त्यांना ९९,३४३ मते पडली. तर,कलाटेंसह बाकीच्या सर्व २६ उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आला नाही. कलाटेंना ४४,०८२ मते मिळाली. त्यामुळे विधानसभेला सलग तीनदा पराभवाची हॅटट्रिक चाखलेल्या कलाटेंवर यावेळी डिपॉजिटही गमावण्याची पाळी आली.

गतवेळी २०१९ ला लक्ष्मण जगतापांविरुद्ध कलाटेंनी एक लाख १२ हजार मते घेतल्याने यावेळी हमखास निवडून येईल,असा दावा त्यांनी केला होता.त्या पार्श्वभूमीवर ते डिपॉजिटही वाचवू न शकल्याने त्यांच्या या दाव्याची चर्चा आता सुरु झाली आहे. आपण जनतेच्या मनातले उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले होते.या जनतेनेच त्यांचे डिपॉजिट जप्त केले.तसेच आता बंड केल्याबद्दल पक्षाकडूनही (ठाकरे गट)त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

कलाटे यांची ही राजकिय आत्महत्या असल्याची टीका होत असताना दुसरीकडे आगामी काळात कलाटे हेच तगडे उमेदवार असतील असेही सांगितले जाते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकिसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांपैकी भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे यांच्यापेक्षा कलाटे हे सर्वसमावेशक आणि दमदार नाव असेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. कदाचित कलाटे हे त्यावेळी भाजपचे उमेदवारसुध्दा असतील, असेही राजकिय विश्लेषकांनी सांगितले.