तळेवडे, दि. २८ (पीसीबी) – एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोहोचविण्यासाठी वाहनात भरून दिलेला तीन लाखांचा माल वाहन चालकाने चोरला. ही घटना रविवारी (दि. २६) रात्री अकरा ते सोमवारी (दि. २७) सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत तळवडे येथे घडली.
तानाजी सोमाजी करपे (वय ४९, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन त्रिपाठी (वय २९, रा. मध्यप्रदेश), विजयकुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा फिर्यादी करपे यांच्या टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. तळवडे येथील करवीर इंडस्ट्रीज मधून करपे यांच्या टेम्पोत तीन लाख दोन हजार ३४५ रुपयांचा माल भरला. तो माल चाकण येथील रिलायबल ऑटो टेक प्रा ली या कंपनीत पोहोच करायचा होता. रस्त्यात सचिन याने विजयकुमार याच्यासोबत संगनमत करून टेम्पोतील माल विजयकुमार याच्या ताब्यातील टेम्पोत भरला. त्यानंतर दोघेजण कंपनीचा माल आणि टेम्पो असा एकूण चार लाख ५२ हजार ३५४ रुपयांचा ऐवज घेऊन दोघेजण पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.