पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. त्यासाठी धरणाजवळ जॅकवेल व पंपहाऊस बांधण्यात येणार आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) तांत्रिक मान्यता घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास 1 कोटी 28 लाख 71 हजार 510 रुपये शुल्क दिले जाणार आहे.
भामा आसखेड धरणाजवळील वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जल उपसा केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच, जॅकवेल, पंपहाऊस, ऍप्रोज ब्रीज, इंटेक चॅनेल बांधणे, विद्युत व यांत्रिकविषयक कामे केली जाणार आहेत. या केंद्राची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. हा प्रकल्प महापालिका केंद्र शासनाच्या अमृत अभियानातून करणार आहे. त्यामुळे डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी प्राधिकरणास प्रकल्पाच्या एक टक्के शुल्क अदा करावे लागणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 153 कोटी 35 लाख 54 हजार इतका आहे. त्यानुसार, 1 कोटी 28 लाख 71 हजार रूपये शुल्क प्राधिकरणास द्यावे लागणार आहेत.