पिंपरी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा

0
256

पदाधिकारी वकिलाचीही जबरी चोरी प्रकरणी पोलिसात फिर्याद

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या हिशोब तपासणीसावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ऍट्रॉसिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पदाधिकारी वकिलाने एका वकील महिलेस चर्चेसाठी बोलावून मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे.

राजेश रमेश रणपिसे (वय ३०, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी वकील महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश रणपिसे याने फिर्यादी वकील महिलेस पिंपरी न्यायालयातील बार रूममध्ये चर्चा करण्यासाठी बोलावले. तिथे महिलेस मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद बोलला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात राजेश रणपिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश गणगे, रोहित परिहार, एक महिला आणि एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश रणपिसे हे पिंपरी न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेले असता निलेश याने रणपिसे यांच्या खिशातून बळजबरीने पाच हजार रुपये काढून घेतले. तसेच तिघांनी रणपिसे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करत दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.