चिंचवडचा आमदार ठरविण्यात युवकांचा कौल महत्वाचा

0
288

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – राज्यातील सर्वांत मोठा मतदार संघ असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार असून चिंचवड मतदार संघात मतदारांच्या संख्येपैकी 50 टक्के मतदार हे युवक आहेत. त्यामुळे 2 लाख 58 हजार तरुण मतदारांच्या हातात भावी आमदाराचे भवितव्य आहे. या युवकांचा कौल विजयासाठी निर्णायक ठरणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे, अपक्ष राहूल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, जगताप-काटे-कलाटे यांच्यातच खरी लढत होत आहे. 26 फेब्रुवारीला 510 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

चिंचवड मतदारसंघात 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 3 लाख 415, महिला 3 लाख 1 हजार 650 तर, तृतीयपंथी 35 मतदार आहेत. मतदारांची वयोगटांनुसार वर्गवारी केल्यास 18 ते 39 या युवा वयोगटांतील मतदारांची संख्या तब्बल 2 लाख 58 हजार 42 इतकी आहे. यंदा प्रथमच मतदार करणारे नवमतदार 4 हजार 251 आहेत. 20 ते 29 वर्षांचे 84 हजार 575 मतदार आहेत. 30 ते 39 वर्षाचे 1 लाख 73 हजार 467 मतदार आहेत. पाठोपाठ 40 ते 49 वयोगटातील 1 लाख 45 हजार 950 प्रौढ मतदार आहेत. 50 ते 59 वयांचे 77 हजार 844, 60 ते 69 वयांचे 48 हजार 84 ज्येष्ठ मतदार आहेत. 70 वर्षांवरील 34 हजार 799 वयोवृद्ध मतदार आहेत.