सोलापूर, दि. २५ (पीसीबी) – देशात शेतकरी संकटात असताना केंद्र आणि राज्य सरकार वाचविण्यासाठी मशगुल आहेत. पीकविमा, कर्जमाफी आणि अनुदानासाठी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार समोर येत आहेत. सोलापूर जिह्यातील राजेंद्र चव्हाण यांनी आपला 512 किलो कांदा 1 रुपयाप्रमाणे विकला. त्याचे बिल 1 रुपये दराप्रमाणे 512 रुपये झाले. यातून हमाली, तोलाई, भाडे, रोख उचल यासाठी त्यातील 509.51 रुपये कपात करत शेतकऱ्याला केवळ 2 रुपयांचा चेक देण्यात आला.
विशेष म्हणजे उर्वरित 2.49 रुपयांच्या चेकसाठी शेतकऱ्याला 15 दिवसांनी बँकेत वटवण्यासाठी व्यापाऱ्याने ताकीद दिली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांच्या मेहनत आणि शेत खर्चाची क्रूर थट्टा पाहायला मिळाली. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटण्यासाठी हे केंद्र आणि राज्य सरकार काम करीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कांद्याबरोबर सध्या फळ आणि पालेभाज्या उत्पादक शेतकरी वाहतूक आणि शासनाच्या करपट्टीमुळे हैराण झाले आहे.











































