प्रत्येक निवडणुकीत त्याच त्या आश्वासनांचा पाऊस पाडणारांना मतदार धडा शिकवतील – राहुल कलाटे

0
310

*अधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्ती कर माफीवरून टीकास्त्र

पिंपरी,दि. २४ (पीसीबी) : अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न तसेच शास्ती कर माफ करण्याचा प्रश्न हे प्रश्न तत्कालीन काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी सरकार व भाजपने लोंबकळत ठेवला आहे.लोकसभा ,विधानसभा ,महापालिका अशा कोणत्याही निवडणुका आल्या की घोषणांवर घोषणांचा पाऊस पाडला जात आहे मात्र राष्ट्रवादी व भाजपचा हा ढोंगीपणा लोकांनी ओळखला आहे त्यामुळे या निवडणुकीत मतदार माझ्यासारख्या सुशिक्षित व प्रश्नांची जाण असणाऱ्या भूमिपुत्रालाच निश्चित विजयी करतील असा विश्वास चिंचवड मतदार संघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे .

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून शिट्टी या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या कलाटे यांनी महाविकास आघाडी व भाजपवर हल्लाबोल केला आहे.

कलाटे यांनी म्हटले आहे की, गेल्या चार दिवसात शहरात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी शहरात प्रचारासाठी येऊन घोषणांचा पाऊस पाडला आहे. 24 तास पाणी, निगडी ते पिंपरी मेट्रो , ट्रान्सपोर्टेशन रस्ते, अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्तीकर माफ करू अशा अनेक घोषणांचा समावेश आहे.

वास्तविक मागे राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते त्यांच्याच कार्यकाळात अनधिकृत बांधकामांवर शास्ती कर लादला गेला त्यावेळी पिंपरी चिंचवड मधील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे व विलास लांडे हे या शहराचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र त्यावेळी विधानसभेत यातील एकानेही शास्तीकरास विरोध केला नाही. त्यामुळे शास्तीकराचे हे भूत उतरवण्यासाठी जनतेला संघर्ष करावा लागत आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना अनधिकृत बांधकामे नियमित करावीत तसेच शास्तीकर माफ करावा यासाठी मुंबई व नागपूर अधिवेशनात जे मोर्चे काढण्यात आले त्यात माझा पुढाकार व महत्त्वपूर्ण सहभाग होता.

सन 2014 च्या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न सोडविण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याचे सांगून लोकसभेला शेकापतर्फे निवडणूक लढवली अपयश आल्यानंतर ते विधानसभा निवडणुकीत भाजपावासी झाले. मात्र अजूनही अनधिकृत बांधकामे व शास्ती कराचा प्रश्न सुटलेला नाही. दिवंगत आमदार जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याची घोषणा भाजप करत आहे हे खरे तर हास्यास्पद आहे.

महापालिकेत त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. स्वच्छ कारभाराचे वचन देऊन पालिकेत सत्ता मिळवली. मात्र पदाधिकारी पोसून टक्केवारी गोळा करण्यात भाजपला रस होता. गेल्या पाच वर्षात टेंडरवरच अधिक खर्च झाला .मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अपयश आले. शहरवासीयांना 24 तास पाणी देण्याची घोषणा केली गेली .मात्र दिवसाआड पाणी तेही अनेक भागात कमी दाबाने मिळत आहे .टँकर लॉबी जोरात आहे. भामा आसखेड व आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनेत भ्रष्टाचार झाला. जॅकवेल प्रकरणात 30 कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा झाली. यात जनतेच्या पदरात मात्र काहीच पडले नाही. वैद्यकीय विभागाने तर अकार्यक्षमतेचा व भ्रष्टाचाराचा कहर केला.संत तुकाराम नगर येथील नेत्र रुग्णालय झाले नाही. डॉक्टर भरतीत घोटाळा झाला.कचरा ,आरोग्य विभागात ठेकेदार पोसण्याचे काम केले गेले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ,केबलिंग ,ड्रेनेज पाईपलाईन घोटाळा ,शिक्षक भरती घोटाळा याची चर्चा झाली . बेकायदा होर्डिंग काढण्याचे कंत्राट व कुत्र्यावर नसबंदी करण्याचे कंत्राट भाजप पदाधिकाऱ्यांना दिले गेले .त्यातही भ्रष्टाचार झाला असा आरोप कलाटे यांनी केला आहे.

एका प्रकरणात ठेकेदारांनी बोगस कागदपत्रे देऊन कंत्राटे मिळवल्याचे उघड झाले . मात्र सत्ताधारी भाजपने त्यांना पाठीशी घातले.कोरोना संकट काळात मास्क पासून व्हेंटिलेटर ,रुग्णांचे जेवण, नाश्ता यातही भ्रष्टाचार झाला.
स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष ऍड.नितीन लांडगे आणि महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली .जामीनावर सुटका अन न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना लांडगे यांनी स्थायी समितीची सभा घेतली कोट्यावधीच्या कामांना मंजुरी दिली हे शहराने पाहिले .त्यामुळे भाजपने पारदर्शक कारभाराची भाषा करू नये असा टोला कलाटे यांनी लगावला आहे.

पिंपरी चिंचवड शहर बकाल केले गेल्याचा आरोप भाजप करत आहे मात्र अण्णासाहेब मगर व प्रा रामकृष्ण मोरे यांनी या शहराच्या विकासाचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात आणले त्यामुळे देशभरातील लोक इथे पोटापाण्यासाठी येत आहेत मिनी भारत म्हणून शहराकडे पाहिले जात आहे. या उलट भाजपाने शहराच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करून हे शहर बकाल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मोदी लाटेत निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे हे लोकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. या परिस्थितीत लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने माझ्यासारख्या भूमिपुत्राला न्याय द्यावा व प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन कलाटे यांनी केले आहे.