अजितदादांची दणदणीत रॅली.. मतदारांचा दणदणीत प्रतिसाद..

0
169

नाना काटे यांच्या प्रचारार्थ रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी… फुलांची उधळण… ढोल-ताशांचा गजर… फटाक्यांची आतषबाजी… बाईकवरून निघालेली तरुणाई… आणि अजित पवारांच्या खणखणीत आवाजात नाना काटे यांना विजयी करण्याचे आवाहन..! नाना काटे यांच्या विजयोत्सवाचा जणू ट्रेलरच चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी गुरुवारी संध्याकाळी अनुभवला!

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार नाना काटे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळे गुरव ते जुनी सांगवी या भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मतदारांची ही उत्स्फूर्त गर्दी पाहून विरोधकांना अप्रत्यक्षरीत्या सणसणीत चपराकच बसल्याची चर्चा रंगली होती.

रॅली सुरु असताना अनेक नागरिकांनी अजित पवार आणि उमेदवार नाना काटे यांना भेटून चिंचवडच्या विकासासाठी नाना काटे यांनाच साथ देणार, अशा भावना व्यक्त केल्या. ‘आमच्या सोसायटीचे प्रश्न रखडलेले आहेत. कचर्‍याच्या समस्येने डोके वर काढले आहे. पाणी टंचाई कधी नव्हे, इतकी तीव्र झाली आहे. या सार्‍या समस्यांना भारतीय जनता पक्षाचा अंधाधुंद कारभार कारणीभूत आहे. दादा, तुम्ही नेतृत्व करत होतात त्या काळात जनतेचे हाल कधी झाले नाहीत. आम्ही भाजपला संधी देऊन खूप मोठी चूक केली. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराची धुरा राष्ट्रवादीच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही चिंचवडपासूनच परिवर्तनाला सुरुवात करू’, असा निश्चय मतदारांनीच बोलून दाखविला.

अजित पवार यांनीही मतदारांना दिलासा दिला. ‘या भागाचा विकास करायचा असेल, तर विकासाची व्हिजन असणारा लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक आहे. नाना काटे यांच्याकडे तो व्हिजन आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना विजयी करा. या भागाचा विकास तर करूच, शिवाय पाण्यापासून सर्व समस्या सोडवण्याची हमी मी देतो’, अशा शब्दात अजित पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले.

सुमारे तीन हजार दुचाकीस्वार या रॅलीत सहभाग झाले होते. हा संदर्भ पकडून अजित पवार म्हणाले की, ‘ही पकडून आणलेली गर्दी नाही. ही परिवर्तनाची आस बाळगून आलेली जनता आहे. त्यामुळे स्वत:हून आलेली ही जनता नाना काटे यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.