प्रचार शिगेला, भाजप आणि महाआघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

0
537

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी (24 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे आजची (23 फेब्रुवारी) संध्याकाळ ही नेत्यांच्या सभांची शेवटची संध्याकाळ असणार आहे. त्यामुळे आज प्रचारासाठी दोन्ही बाजूचे सर्वोच्च नेते मैदानात उतरणार आहेत. चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी अजित पवार यांचा रोड शो आणि सभेची तयारी राष्ट्रवादीकडून सुरु आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून आज छगन भुजबळ, एकनाथ खडसे, जयंत पाटील हे चिंचवडमध्ये प्रचार करणार आहेत.

कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिडे पुलापासुन पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर डेक्कनच्या नदीपात्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी आदित्य ठाकरे हे रोड शो करणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चिंचेची तालीम इथे एकत्रित सभा होणार आहे.

चिंचवडमध्ये रोहित पवार यांचा सकाळी रोड शो देखील आयोजित केला होता. त्यासोबतच चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संध्याकाळी सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर सभा घेणार आहेत.

भाजप आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी
पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. कसबा आणि चिंचवड निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडी जोर लावत आहेत. शिवाय इथे बंडखोर राहुल कलाटे यांचाही जोरदार प्रचार सुरु आहे.

पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला निकाल
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.