पोलीस अटक करण्यासाठी येताच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

0
196

देहूरोड, दि. २२ (पीसीबी) – महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले. पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी आले असल्याचे समजताच त्याने पोलिसांना धक्कबुक्की करून स्वतःवर ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.

जलसिंग राजपूतसिंग दुधानी (वय ३५, रा. जांभूळगाव, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. ब्लेडचे वार झाल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष काळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यातील आरोपी निष्पन्न झाले. त्यातील एकजण देहूरोड येथील सेंट्रल चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तिथे सापळा लावला. मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता पोलिसांनी जलसिंग याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी आले असल्याचे समजताच त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली.

तसेच स्वतःची अटक टाळण्यासाठी त्याने स्वतः जवळ असलेल्या ब्लेडने पोलिसांना मारून जखमी करण्याचा प्रयत्न केला. मला पकडले तर तुम्हाला दाखवतो. मी आत्महत्या करतो, असे म्हणून त्याने स्वतःच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करून घेतले. त्यात जलसिंग जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.