चिंचवडसाठी मुख्यमंत्री पहाटे ३ वा. जगतापांकडे तर, पहाटे ५ वा. खासदार बारणेंकडे

0
277

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी घेतलेली शपथ आजही चर्चेत आहे. कित्येकदा पवार यांच्यावर टीका होत असते, पण त्याहीपेक्षा आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्रीचे किंवा पहाटेचे दौरे मोठे गूढ निर्माण करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यशैली आता भलतीच चर्चेत आली आहे. सोमवारी पुणे शहरात कसबा मतदारसंघात मध्यरात्री पर्यंत त्यांच्या गाठीभेटी सुरु होत्या. आज पहाटे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. पहाटे ३ वाजता पिंपळे गुरव येथील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंगल्यावर तब्बल दीड तास ते होते आणि त्यानंतर पहाटे ५ वाजता थेरगाव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी दोन तास गप्पांची मैफल रंगली होती. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच चिंचवड पोटनिवडणुकित भाजपच्या अश्विनी जगताप यांच्यासाठी आता सर्व प्रतिष्ठा पणाला लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ आहे.

ठाणे शहरात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा टेंभीनाका येथील जनता दरबार हा रात्री नऊ नंतर पहाटे पर्यंत सुरू असायचा. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे पट्टशिष्य असल्याने त्यांचाही तोच खाक्या आहे. मंत्रालय किंवा वर्षा या त्यांच्या कार्यालयातसुध्दा रात्रीनंतरच खरे कामकाज चालू होते आणि पहाटे पर्यंत निर्णय होत असतात. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी एका भाषणात आम्ही पहाटे ६ वाजता काम सुरू करतो असे म्हटले होते पण शिंदे हे २४ तास काम करतात, ते झोपतात कधी तेच कळत नाही, असे मिश्किलपणे म्हटले होते. पिंपरी चिंचवडकरांना त्याचे प्रत्यंतर आज पहाटे आले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी चिंचवड पोटनवडणुकित जातीने लक्ष घातले आहे. एन मध्यरात्री पिंपळे गुरवला त्यांचा वाहनांचा ताफा आल्याने परिसरातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यर्त्यांबरोबर शिंदे यांनी महत्वाची चर्चा केली. त्यानंतर पहाटे ५ वाजता त्यांचा मोर्चा थेरगावकडे खासदार बारणे यांच्या निवासस्थान पोहचला. शिंदे यांनी तिथेही सविस्तर चर्चा केली आणि उमेदवार जिंकण्यासाठी काय काय केले पाहिजे यांचा आढावा घेतला. आजवर मध्यरात्री किंवा पहाटेचा दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचा असा दौरा पिंपरी चिंचवडकरांनी प्रथमच अनुभवला.दरम्यान उद्या सकाळी मुख्यमंत्री पुन्हा शहरात असून शहरातून ते रोडशो करतील आणि नंतर जाहीर प्रचार सभा होणार आहे, असे सांगण्यात आले.