`पेड न्यूज` साठी भाजपच्या अश्विनी जगताप यांना नोटीस

0
188

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. भाजपसाठी ही निवडणूक जास्तच आव्हानात्मक ठरणार हे निश्चित आहे. निवडणुकीपूर्वीची सर्वेक्षणं भाजपने गांभीर्याने घेतली आहेत. त्यामुळेच अत्यंत काटेकोरपणे रणनीती आखली जात आहे. एवढं असूनही चिंचवडमधील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस धाडली आहे. जगताप यांच्याकडून आयोगाने लेखी उत्तर मागवले आहे. अश्विनी जगताप यांनी खुलासाही पाठवला आहे. आता या उत्तराची पडताळणी आयोगाच्या विशेष समितीकडून सुरु आहे.

काय घडलं नेमकं?
पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. विजयाचा गुलाल आपणच उधळणार, या आत्मविश्वासाने मविआ तसेच भाजप-शिंदे गट कामाला लागले आहेत. मात्र प्रचारांतील प्रत्येक घडामोडीवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष आहे. चिंचवड मतदार संघात आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आल्या. त्यापैकी 10 तक्रारीवरून गांभीर्याने कारवाई करण्यात आली आहे. मतदार संघातील पोट निवडणूक जाहीर झाल्यापासून सुमारे 43 लाख रुपयांची रोकड, चार लाख 97 हजार 625 रुपये किंमतीचे मद्य आणि 94 हजार 750 रुपयांचा 3 किलो 584 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरून नोटीस बजावण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीच्या रणधुमाळीत आयोगातर्फे चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी नेमण्यात आली आहे.भाजप उमेदवार अश्विनी जगपात यांच्याबद्दलची एक बातमी न्यूज पोर्टल आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हा एकूणच मजकूर पेड न्यूज सारखा असल्याचे एमसीएमसी समितीच्या निदर्शनास आले होते. यावरून सदर समितीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला यासंबंधीचं पत्र पाठवलं होतं. त्यानुसार,पोट निवडणुकी संबंधित निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी १६ फेब्रुवारी रोजी भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना नोटीस पाठवली आहे. अश्विनी जगताप यांचे लेखी म्हणणेही आयोगाने मागवले. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला अश्विनी जगताप यांनी खुलासादेखील पाठवला आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या पेड न्यूज आता काही दैनिकांमध्येही सुरु झाल्याचा संशय निवडणूक विभागाला असून त्याची पडताळणी करण्यात येत आहे. पेड न्यूज करणाऱ्या उमेदवारांच्या बातम्या जाहिरात दराने छापल्या जातात आणि त्या एकतर्फी असतात, असेही लक्षात आले आहे.

एमसीएमसी समितीला यासंबंधीचा खुलासा पाठवण्यात आला आहे. आता ही समिती सदर उत्तराची पडताळणी करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित केली जाईल. त्यामुळे आयोगातर्फे काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय