विकासाच्या वल्गना करणा-या प्रतिस्पर्ध्यांनी एकाच व्यासपीठावर चर्चा करावी – राहुल कलाटे

0
229

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – चिंचवड मतदारसंघाच्या निर्मितीपासून चिंचवड मतदारसंघ जगताप कुंटुबियांच्या ताब्यात होता. तर, राष्ट्रवादीची महापालिकेत 15 वर्षे सत्ता होती. असे असतानाही चिंचवडकरांना पाण्यासारखा जीवनावश्यक समस्येला सामोरे जावे लागते. यातच भाजप आणि राष्ट्रवादीच्या विकासाचा दावा किती फोल आहे हे स्पष्ट होते. विकासाच्या वल्गना करणा-या प्रतिस्पर्ध्यांनी एकाच व्यासपीठावर येवून चर्चा करावी, असे खुले आव्हान अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिले.

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शिट्टी चिन्हावर लढत असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबाबत आदर व्यक्त करत राहुल कलाटे म्हणाले, चिंचवड मतदारसंघ 13 वर्षे जगताप यांच्या ताब्यात होता. पण, या 13 वर्षाच्या कालावधीत चिंचवडचा सर्वांगीण विकास झाला नाही. मतदारसंघातील उपनगरे विकासापासून वंचित आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. मागील पाच वर्षे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना विकास कामांपेक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुनच भाजप जास्त चर्चेत राहिला. भाजपने टक्केवारीच्या राजकारणापायी शहराची विभागणी केली. या विभागणीमुळे शहर मागे पडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 15 वर्षे महापालिकेत सत्तेत होता. 15 वर्षे सत्ता असताना शहरातील पाण्याचे नियोजन करता आले नाही. शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही. भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले. मागील पालिका निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला नाकारले होते. विरोधात असताना राष्ट्रवादीने कोणते प्रकरण तडीस लावले नाही. आताचे राष्ट्रवादीचे उमेदवार महापालिकेत विरोधी पक्षनेते असताना सभागृहात किती वेळा बोलले, हा संशोधनाचा विषय आहे. राष्ट्रवादी आणि भाजपला वाढत्या लोकसंख्येनुसार शहराचा विकास करता आला नाही. शहर विकासाचे नियोजन केले नाही. या दोनही पक्षांमुळे शहर विकासात मागे पडत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत जनता आपल्यासारख्या उच्चशिक्षित उमेदवाराच्या पाठिशी उभी राहिल असा ठाम विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला.