शिवरायांचे राज्य लोककल्याणकारी – राजेंद्र घावटे

0
282

निगडी, दि. २० (पीसीबी) : “छत्रपती शिवाजी महाराज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये रयतेचे राज्य उभे केले. एक एक बलाढ्य शत्रूशी सामना केला. सर्वसामान्य जनता , शेतकरी , कष्टकरी यांना अन्याय , अत्याचार, अनाचार यापासून मुक्त करत लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली…आक्रमकांना थोपवत प्रतिकार केला… शिवरायांच्या कार्यामुळे आणि प्रेरणेमुळेच उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणां ऐवजी दक्षिणेकडून उत्तरेकडे आक्रमणे होऊ लागली. त्यातून देशाच्या इतिहासाची दिशा बदलली. इतिहासाचे प्रवाह बदलले. म्हणूनच छत्रपती शिवराय हे युगप्रवर्तक राजे ठरतात.” असे प्रतिपादन शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.

दुर्गा टेकडीवरील सर्वोच्च स्थानी असलेल्या सुप्रभात हॉल या ठिकाणी आयोजित शिवजयंती कार्यक्रमात घावटे यांचे “युगप्रवर्तक छत्रपती शिवराय” या विषयावर व्याख्यान झाले. सुप्रभात संघ व जेष्ठ नागरिक संघाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नगरसेवक मारुती भापकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते..सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष रवींद्र मोहिते यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक मोहिते, माजी उपायुक्त संतोष माने, विजय शिंदे, बाबा नायकवडी, काशिनाथ भोसले, प्रकाश ननावरे, अंकुश बंडगर, बन्सल, विलास कुऱ्हाडे आदींची प्रमुख उपस्थती होती. कु. स्पृहा नायकवडी हिच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, “अठरापगड जातींना बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.

स्वकीयांचे स्वराज्य म्हणजे राजमाता जिजाऊंच्या निर्धाराचे प्रतीक आहे. जीवाला जीव देणाऱ्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्य साकार झाले… शिवरायांचा इतिहास हा शौर्याचा आणि धैर्याचा आहे. जगात अनेक शूर पराक्रमी राजे होऊन गेले. परंतु त्यातील लोककल्याणकारी राजे खूप कमी . तसेच त्यातील अनेकांचे राज्य त्यांच्यानंतर टिकले नाही. परंतु शिवरायांनी लोककल्याणकारी राज्याची स्थापना करून लोकशाही व्यवस्थेचा पाया रचला. तसेच महाराजांनंतर स्वराज्य अनेक वर्षे टिकले. दिल्लीसह देशाच्या विविध भाग पुढील काळात मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. शिवचरित्रामध्ये भारतवर्षाचे अखंड मार्गदर्शन करण्याची शक्ती आहे.” असे सांगत त्यांनी शिवचरित्रातील अनेक दाखले दिले.

भापकर म्हणाले की, ” लोकांच्या सेवेसाठी छत्रपतींचे राज्य होते. त्यांचा इतिहास केवळ लढायांचा नाही. लोकाभिमुख प्रशासन, शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य आदी बाबींचा आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. लोकप्रतिनिधी लोकांना लुबाडत आहेत. आपण लोकांच्या सेवेसाठी निवडून येतो याचा लोकप्रतिनिधींना निवडून आल्यावर विसर पडतो. हे चित्र बदलले पाहिजे.. महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजेत…”

संपतराव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले…..
म न पा चे भोसले यांच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सुप्रभात संघ, सूर्यनमस्कार संघ व रोज सकाळी टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.